पुणे : शहरातील वाहने जाळण्याच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ होत चालली असून, शुक्रवारी एरंडवण्यातील राजमयूर सोसायटीमध्ये पाच दुचाकी पेटविण्यात आल्या. वाहनांना लागलेल्या आगीच्या धगीमुळे पहिल्या मजल्यावरील सदनिकेतील टीव्ही, एसी जळाल्यामुळे दोन लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. संजीव मुळे (वय ४८, रा. एरंडवणा गावठाण) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एरंडवण्यातील पर्सिस्टंट कंपनीच्या मागील बाजूस राजमयूर सोसायटी आहे. सोसायटीतील पार्किंगमधून रात्री दीडच्या सुमारास धुर येऊ लागला. कोणीतरी वाहनांना आग लावलेली असल्याचे रहिवाशांच्या लक्षात आले. अनेकांना धुरामुळे घरामध्ये गुदमरायला लागले होते. नागरिकांनी आरडाओरडा करीत अग्निशामक दलाला माहिती दिली; मात्र अवघ्या काही क्षणातच पार्किंगमधील पाच दुचाकी आगीमध्ये जळून खाक झाल्या, तर सहा दुचाकींना आगीची झळ बसली. या आगीमुळे दुचाकीच्या पेट्रोलच्या टाक्या फुटल्या. त्यामुळे आग जास्तच भडकली. पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या प्राची शहा यांच्या घरापर्यंत आगीच्या ज्वाळा जात होत्या. आगीची धग बसल्यामुळे त्यांच्या घरामधील एसी आणि टीव्ही जळाला, तर खिडकीची तावदाने फुटली. सोसायटीमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आलेला नसल्यामुळे हे कृत्य नेमके कोणी केले, हे स्पष्ट झाले नाही. या भागात पेट्रोलचोरीच्या घटना वारंवार घडत असून, पेट्रोलचोरांचेच हे कृत्य असावे, असा संशय रहिवाशांनी व्यक्त केला आहे. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त तुषार दोषी, डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चौगुले यांनी घटनास्थळी भेट दिली. तपास सहायक पोलीस निरीक्षक आर. बी. पन्हाळे करीत आहेत.
एरंडवण्यात पुन्हा वाहने जाळली
By admin | Published: March 26, 2016 3:15 AM