लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मांजरी येथील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रा. लि. कंपनीत गुरुवारी (दि.२१) लागलेल्या आगीची घटना वेळेत अग्निशामक दलाला कळविण्यात आली असती तर कदाचित पुढील अनर्थ टाळता आला असता. ही घटना कळविण्यात उशीर झाला असण्याची शक्यता अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.
‘सिरम’मध्ये आग लागल्याचे माहिती पुणे महापालिकेच्या अग्निशामक दलाला २ वाजून ३३ मिनिटांनी कळविण्यात आले. पुणे प्रादेशिक महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)च्या अग्निशामक दलाला २ वाजून ३५ मिनिटांनी आगीची माहिती समजली. दोन्ही दलाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांशी ‘लोकमत’ने संपर्क साधला.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार की, या आग लागलेल्या इमारतीमध्ये उत्तम दर्जाची ‘फायर फायटिंग सिस्टीम’ आहे. इमारतीमध्ये स्प्रिंकलर्स, डिटेक्टर्स आणि हॅन्ड्रन्ट्स आहेत. आग लागल्यानंतर ही यंत्रणाही सुरू झाली होती. परंतु, आगीचा भडका उडाल्याने या यंत्रणेद्वारे आग आटोक्यात आणणे अवघड झाले असावे. याच यंत्रणेतून अग्निशामक दलाच्या वाहनांना पुरवण्यात आलेल्या पाण्यानेच आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
आग लागल्यानंतर सुरुवातीला ‘सिरम’ कर्मचाऱ्यांनी अग्निरोधक यंत्रणेचा वापर करून विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, आग आटोक्यात आणणे त्यांना शक्य न झाल्याने त्यांनी नंतर अग्निशामक दलाला माहिती कळविली असावी, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. साधारणपणे २ वाजून २२ मिनिटांनी इमारतीमधील ‘डिटेक्टर’ पेटला. त्यानंतर साधारणपणे दोन-तीन मिनिटातच आग लागल्याचे निष्पन्न झाल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. त्यानंतर आठ मिनिटांत अग्निशामक दलाला आगीची वर्दी देण्यात आली.
इमारतीचा पूर्ण मजला आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याकरता काही कालावधी लागतो. परंतु, एकाच वेळी मजल्याच्या सर्व बाजुंनी धूर आणि आग निघत होती. त्यामुळे आगीची माहिती कळवेपर्यंत बराच वेळ गेला असावा, असेही काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
चौकट
स्फोट कशाचे?
आग लागल्यानंतर स्फोटाचे अनेक आवाज ऐकल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. हे स्फोट नेमके कशाचे हे समजत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
चौकट
आगीत काय झाले?
आग लागलेली इमारत ५० हजार चौरस फुटांची आहे. पहिल्या मजल्याचा वापर लस निर्मितीसाठी सुरू होता. दुसऱ्या मजल्यावर प्रयोगशाळेचे काम सुरू होते. याठिकाणी विविध यंत्रसामग्री, इलेक्ट्रिक पॅनल, संगणक, अन्य साहित्य, इलेक्ट्रिक वायरिंग आदी साहित्य होते. हे सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
चौकट
‘फायर फायटिंग सिस्टीम’ निरुपयोगी?
अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार, ‘सिरम’मधील अग्निरोधक यंत्रणा जर एवढी अत्याधुनिक आणि दर्जेदार होती तर मग आग थोड्याच अवधीत एवढ्या वेगाने का पसरली?