पुणे : पुणे स्टेशन परिसरातील सोहराब हॉल इमारतीतील क्रॉसवर्ड या पुस्तक विक्रीच्या दुकानाला लागलेली आग आटोक्यात आली आहे. तरीही दुकानातून अद्याप धूर येत असल्याने अग्निशमन दलाचा एक बंब घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे. या आगीच्या तीव्रतेमुळे या इमारतीला तडे गेले असून, नुकसानीचा आकडा कोट्यवधींच्या घरात जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.सोहराब इमारतीत पहिल्या मजल्यावरील क्रॉसवर्ड या दुकानाला रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग सोमवारी आटोक्यात आणली. तसेच जवानांनी इमारतीत अडकलेल्या सुरक्षा रक्षकासह चार जणांची सुटकाही केली. या आगीत दुकानातील सर्व पुस्तके, फर्निचर तसेच इतर साहित्यही भस्मसात झाले. आग आटोक्यात आल्यानंतरही धुराचे लोट निघत असल्याने अग्निशमन दलाने घटनास्थळी ठाण मांडले होते. १२ हजार स्क्वेअर फुटाचे हे दुकान आहे.अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी सांगितले, की आगीमुळे पहिल्या मजल्याला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे स्ट्रक्चरल इंजिनिअरकडून इमारतीची पाहणी करणे आवश्यक आहे. बंडगार्डन पोलिसांनीही घटनास्थळाची पाहणी केली आहे. मात्र, आग कशामुळे लागली, याचे कारण समजू शकलेले नाही. (प्रतिनिधी)
आगीमुळे इमारतीला तडे
By admin | Published: September 30, 2015 1:44 AM