पुणे : कोंढवा, लुल्लानगर चौकात असणाऱ्या माणिकचंद मलबार हिल या अकरा मजली इमारतीमध्ये सहाव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्येआग लागल्याची घटना समोर आली आहे. रविवारी (19 ऑगस्ट) सकाळी साडेदहा वाजता ही घटना घडली. सिक्युरिटी इनचार्ज विलास पाटील व सिक्युरिटी ऑफिसर साजिद अत्तार यांच्या वेळीच लक्षात आल्याने फ्लॅटमधील दोघांना सुखरुप बाहेर पडता आले. तसेच अग्निशमन जवानांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला आहे.
इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन प्रचंड धूर येत असल्याचे एका ऑफिस बॉयच्या लक्षात आले. त्याने लगेचच याबाबत इतरांना माहिती दिली. फायर एस्टिंगविशरच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात येत नसल्याचे पाहून अग्निशमन दलाला याबाबत माहिती देण्यात आली. आग लागलेल्या फ्लॅटमधील दोन जणांना घराबाहेर काढण्यात आले. तसेच आग विझवण्यात जवानांना यश आले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.आगीमुळे फ्लॅटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हॉलमधील साहित्य जळून खाक झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.