पिंपरी : लक्ष वेधून घेण्यासाठी आणि वातावरण निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. फटाक्याची माळ किंवा आकाशातील आतषबाजी झाली की, समजायचे उमेदवाराची प्रचार रॅली येत आहे. यासाठी बाजारपेठेत फटाक्यांना मागणी वाढली असून, दिवाळीपूर्वीच सर्वत्र फटाके फुटत आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता १२ आॅगस्टला लागू झाली. तेव्हापासून प्रचाराला सुरुवात झाली आहे. बैठका, मेळावा आणि रॅली काढत मतदारसंघात संपर्क वाढविण्यात आला. या प्रत्येक प्रसंगी फटाके फोडले गेले. प्रमुख पक्षांकडे उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक होते. त्यासाठी मोर्चेबांधणी करीत आपल्या पदरात तिकीट पडताच आनंदोत्सव साजरा केला गेला. या वेळेस मोठ्या प्रमाणात फटाके फोडत आतषबाजी केली गेली. उमेदवारी अर्ज भरताना शक्तिप्रदर्शन केले गेले. लांबपर्यंतच्या रॅलीमध्ये ठिकठिकाणच्या चौकांत फटाके फोडले गेले. अपक्षांना मागणीप्रमाणे आवडीचे चिन्ह मिळाल्यानंतरही फटाक्याद्वारे आनंद साजरा केला गेला. प्रचाराचा नारळ फोडताना, संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाला मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. नेत्यांचे आगमन झाले. सभा सुरू होण्यापूर्वी, तसेच कोणी पाठिंबा दिल्यानंतर फटाक्याची लड पेटते. ज्येष्ठ आणि वजनदार नेते असतील तर, फटाक्याची संख्या अधिक असते. प्रचारास कमी अवधी शिल्लक असल्याने पदयात्रा आणि रॅली काढून मतदार संघ पिंजून काढला जात आहे. त्यामुळे फटाके आणि आतषबाजीची संख्या वाढतच आहे. कार्यकर्ते आणि समर्थक त्यात आघाडीवर आहेत. वस्ती, गर्दीचे ठिकाण, चौक आणि रस्त्यांवर ५ ते १० हजारांची माळ रचली जाते. उमेदवार किंवा नेते मंडळी जवळ येताच ती पेटवली जाते. ५ ते १० मिनिटे दणदणाट होतो. आवाज शांत होताच उमेदवारांच्या नावाने जोरदार घोषणा दिल्या जातात. उमेदवार हात जोडत अभिवादन करीत प्रकट होतो आणि पुढील कार्यक्रम सुरू होतो. आचारसंहिता लागू झाल्यापासून प्रचारात रंगत आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासून फटाक्यांची तडतड अधिकच वाढली. ती अद्याप कायम आहे. अर्ज भरण्यापासून सुरू झालेली ही दिवाळी येत्या सोमवारी (दि. १३) सायंकाळपर्यत कायम राहणार आहे. निवडणुकीमुळे फटाक्यांना मागणी वाढली आहे. दरम्यान, रॅली, पदयात्रा आणि सभेच्या वेळी आवर्जून फटाके फोडले जातात. मोठ्या मोठ्या अनेक माळा असतात. त्यामुळे या ठिकाणी कागदाचा खच पडतो. रॅली आणि सभा संपल्यानंतर त्या ठिकाणी हा कचरा तसाच पडून राहतो. महापालिकेच्या कर्मचारी हा कचरा साफ करतात. फटाक्यामुळे ध्वनी, वायुप्रदूषणासोबत कचराही वाढत आहे. (प्रतिनिधी)
दिवाळीपूर्वीच फटाक्यांचा धूर
By admin | Published: October 10, 2014 6:22 AM