लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कुमठेकर रस्त्यावरील राज्य शिक्षण संशोधन परिषदेच्या कार्यालयाच्या आवारात ठेवलेल्या टाकाऊ लाकडी सामानाला मंगळवारी (दि. ३०) दुपारी आग लागली. या आगीत हे सामान जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग काही मिनिटांत विझविली.
कुमठेकर रस्त्यावरील राज्य शिक्षण परिषदेची तीन मजली इमारत आहे. इमारतीच्या आवारात तळमजल्यावर लाकडी सामान, जुनी कपाटे ठेवण्यात आली होती. दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास या सामानाने अचानक पेट घेतला. त्यातून मोठ्या प्रमाणावर धूर येऊ लागला.
आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या कसबा पेठ आणि एरंडवणे केंद्रातील २ बंब, टँकर घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या कसबा केंद्राचे प्रमुख सुनील नाईकनवरे, तांडेल राजेंद्र पायगुडे, सुरेश पवार, अरगडे यांनी तातडीने पाण्याचा मारा करुन ही आग १० मिनिटात आटोक्यात आणली. ‘शॉर्ट सर्किट’ने आग लागल्याची शक्यता अग्निशमन दलाने व्यक्त केली.