पुणे : शहरातील दोन उद्योजकांनी मिळून रेडमँटिक या नावाने आग विझविणारे अग्निशमन यंत्र तयार केले आहे. सागर रासकर आणि पंकज शेळके या तरुणांनी दोन वर्षांच्या अथक परिश्रम आणि संशोधनातून यंत्राची निर्मिती केली आहे.
ज्या ठिकाणी आग लागण्याची शक्यता आहे अशा जागी ते यंत्र बसविण्यात आले आहेत. आग लागल्यास आगीच्या ज्वाळांची धग त्या यंत्रापर्यंत पोहोचते. त्यातून यंत्रातील सेन्सर्स कार्यान्वित होतात. याबरोबर यंत्र फुटून त्यातून पावडर बाहेर पडून ती आगीवर फवारली जाते. यामुळे आग आटोक्यात येण्यास मदत होते. आग लागली असताना आगीच्या ठिकाणी हे यंत्र फेकताच तत्काळ आग आटोक्यात येते. या यंत्राचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यंत्र वापरात असताना त्याच्या होणाऱ्या मोठ्या आवाजाने परिसरातील नागरिकांना दुर्घटनेची माहिती मिळते. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी या यंत्राचे विशेष कौतुक केले असून परिक्षेत्रातील पोलीस ठाण्यांना ते यंत्र घेण्याच्या सूचना केल्या.