पुणे : शहराचा विस्तार वेगाने होत असताना अग्निशामक दलाच्या सक्षमीकरणाकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे. दलात महत्त्वाचा घटक असलेल्या यंत्रचालकांचा तुटवडा जाणवत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यंत्रचालकांची तब्बल २४ पदे रिक्त असून, वारंवार पाठपुरावा करूनही तांत्रिक अडचणींमुळे ती भरण्यास विलंब होत आहे. आग लागल्याची माहिती मिळूनही चालक नसल्याने अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी वेळेत न पोहोचल्याची गंभीर घटना मंगळवारी घडली.सहकारनगर पोलीस ठाण्यासमोरील मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या बेवारस वाहनांना दुपारी आग लागली. याबाबची माहिती अग्निशामक दलाला कळविण्यात आली; मात्र सहकारनगरपासून जवळ असलेल्या कात्रज केंद्रात चालक नसल्याने भवानी पेठ केंद्रातून अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. यामध्ये बराच वेळ गेल्याने आग आटोक्यात आणण्यासही विलंब लागला. चालक नसल्याने अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी लवकर पोहोचू शकत नाही, ही खूप गंभीर बाब आहे. अग्निशामक दलात यंत्रचालकाची एकूण ८१ पदे मंजूर आहेत. त्यांपैकी २४ जागा रिक्त असल्याचे समोर आले आहे.शहरात अग्निशामक दलाची १२ केंद्रे असून, एकूण २७ (फायर इंजिन) गाड्या आहेत. याशिवाय, इतर अत्याधुनिक वाहनेही दलाकडे आहेत. या प्रत्येक केंद्रावर अग्निशामक दलाची एक गाडी आहे, तर नियंत्रण कक्षामध्ये ८ गाड्या ठेवण्यात येतात. सर्व ठिकाणी ३ शिफ्टमध्ये चालकांची नियुक्ती करावी लागते. सध्या चालकांची पदे रिक्त असल्याने प्रत्येक गाडीसाठी प्रत्येक शिफ्टमध्ये एका चालकाची नेमणूक केली जाते. पण, विविध कारणांमुळे चालकाने सुटी घेतल्याने किंवा अन्य आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास चालकाअभावी या गाड्या केंद्रातच उभ्या ठेवाव्या लागत आहेत. मंगळवारी घडलेल्या घटनेमुळे ही बाब प्रकर्षाने समोर आली आहे. सहकारनगरमधील आग मोकळ्या जागेतील वाहनांना लागल्याने जीवित हानी झाली नाही. मात्र, ही आग एखाद्या सोसायटीत लागली असती, तर अग्निशामक दलाची गाडी पोहोचण्यास विलंब झाल्याने विपरीत घटना घडण्याची शक्यता अधिक होती. शहराचा विस्तार वेगाने होत असताना आगीच्या घटनांमध्ये वाढ होणे साहजिक आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.दोन वर्षांपासून यंत्रचालकांची पदे भरण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. चालकांसाठी पूर्वी सातवी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता होती. आता ही पात्रता दहावी उत्तीर्ण करण्यात आली आहे. त्यानुसार नवीन पदे भरण्यात तसेच इतर काही प्रक्रिया पूर्ण करण्यात तांत्रिक अडचणी येत असल्याने अडथळे येत आहेत. फायरमन किंवा इतर पदेही काही प्रमाणात रिक्त आहेत; पण चालकही खूप महत्त्वाचे असतात. चालक नसल्याने गाडी केंद्राबाहेर पडू शकत नाही; त्यामुळे गरज ओळखून तातडीने रिक्त पदे भरायला हवीत.- प्रशांत रणपिसे, मुख्य अग्निशमन अधिकारी
अग्निशामक दलालाच तांत्रिक अडचणींची झळ
By admin | Published: March 30, 2016 2:17 AM