पुणे : नागरिकांच्या सुरक्षिततेकरिता कितीही कायदे व नियम केले, तरी देखील त्यांच्याकडून ते धाब्यावर बसविले जातात. याचा प्रत्यय अनेकदा पाहावयास मिळतो. आपण राहत असलेल्या इमारतींमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा बसविण्याची सक्ती केल्यानंतर, त्या सूचनेचे पालन करण्यात आले; मात्र वर्षानुवर्षे इमारतीत असलेली ती यंत्रणा कितपत कार्यक्षम आहे, याची तपासणी करण्याची तसदी कोणी घेत नाही. ही वस्तुस्थिती अग्निशमन विभागाचे कर्मचारी सांगतात. आग सांगून लागत नसली, तरी आणीबाणीच्या प्रसंगात इमारतीतील प्रतिबंध यंत्रणाच बंद पडण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.बुधवारी मुंबईतील परळच्या उच्चभ्रू परिसरात एका १७ मजली इमारतीला आग लागली. त्यात चार जणांना आपले प्राण गमवावे लागले. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील इमारतींमध्ये असणाऱ्या आगप्रतिबंधक यंत्रणा कितपत कार्यान्वित आहेत?याविषयी, अग्निशमन यंत्रणेचे अधिकारी प्रशांत रणपिसे यांना विचारले असता ते म्हणाले, की इमारत मग ती रहिवासी, कमर्शियल आणखी कुठल्याही स्वरूपाची का असेना त्यात आगप्रतिबंधक यंत्रणा बसविण्याची जबाबदारी त्या सोसायटीची असून, त्यांना त्या स्वरूपाचा दाखला अग्निशमन प्रशासनाकडून घ्यावा लागतो. अनुचित प्रकार टाळण्याकरिता, जीवितहानी, वित्तहानी होऊ नये यासाठी नियमावलीची सक्ती केली जाते. त्यानुसार कंत्राटदार इमारतींमध्ये यंत्रणा उभी करतात. पुढे त्याकडे दुर्लक्ष केले जाते.सध्या शहरातील जास्तीत जास्त इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा आहे. मात्र, त्या यंत्रणेत अनेक स्वरूपाचे बिघाड असल्याने त्या ऐनवेळी काम करीत नाहीत. याक रिता सहा महिन्यांना किंवा वर्षातून एकदा संबंधित यंत्रणेच्या महत्त्वाच्या भागाची तपासणी करणे गरजेचे आहे. यापुढील काळात ज्या इमारतींमधील यंत्रणा नादुरुस्त असेल, त्या सोसायट्यांचा पाणी व वीजपुरवठा बंद करण्यात येणार असल्याचे रणपिसे यांनी सांगितले. यापूर्वीदेखील ज्यांना नोटिसा देण्यात आल्या त्यांनी गांभीर्याने आगप्रतिबंधक यंत्रणा अद्यावत ठेवणे महत्त्वाचे आहे.विद्यार्थी व नागरिकांना प्रशिक्षित करण्यावर भरपरळ येथील आग दुर्घटनेत एका मुलीने इतर चार जणांचे जीव वाचवले. तिला शाळेतून आगदुर्घटनेत बचावाचे प्रशिक्षण मिळाले होते. पुण्यातदेखील अग्निशमन यंत्रणा शहरातील वेगवेगळ्या भागातील शाळांमध्ये जाऊन तिथे आगीपासून संरक्षणाचे धडे देते. यात विद्यार्थ्यांबरोबरच, नागरिकांचाहीदेखील सहभाग असतो. आगीच्या प्रसंगी एलपीजीचे कनेक्शन बंद करणे, विद्युतपुरवठा बंद करणे, घरात अनावश्यक वस्तूंचा साठा कमी करणे, लहान मुलांना ज्वालाग्रही पदार्थ हाताळू न देणे अशा सूचना देऊन त्यांना प्रशिक्षित केले जाते. या कामी अग्निशमन दलाचे कर्मचारी महत्त्वाची भूमिका बजावतात.पुरेसा मेन्टेनन्सनसणे मुख्य कारणबहुसंख्य इमारतींमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा असली, तरीदेखील त्याचा पुरेसा मेन्टेनन्स नसणे हे अपघाताची तीव्रता वाढण्याचे मुख्य कारण आहे. नागरिकदेखील यंत्रणा सुरक्षित व कार्यक्षम असावी यासाठी जागरूक नसल्याचे अग्निशमन प्रशासन सांगते. सावधगिरी व पुरेशी काळजी घेतली गेल्यास त्या प्रसंगाला धैर्याने तोंड देता येते. मात्र, याचा सोयीस्करपणे त्यांना विसर पडलेला असतो.नवीन इमारत बांधणी कायद्यानुसार आता त्यात अग्निशमन यंत्रणा बसविणे अनिवार्य केले आहे. शहरात जवळपास सर्वच इमारतींमध्ये फायर एक्स्टिंगशरची यंत्रणा कार्यरत आहे. परंतु त्या यंत्रणेकडे ज्या गांभीर्याने लक्ष द्यायला हवे तसे दिले जात नाही. अनेक इमारतींमध्ये आग लागल्यानंतर तेथील आग प्रतिबंधक यंत्रणा बंद अवस्थेत असल्याचे दिसून आले आहे. सोसायटीकडून त्या यंत्रणेची काळजी घेतली गेली नसल्याने संकटप्रसंगी नागरिकांना अग्निशमन यंत्रणेवरच अवलंबून राहावे लागते.- प्रशांत रणपिसे,अधिकारी, अग्निशमन यंत्रणा
इमारतींमधील अग्निशमन यंत्रणा कुचकामी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 4:20 AM