पुणे : लोहगाव येथील एका फर्निचर कारखान्याला मंगळवारी सकाळी आग लागली. या आगीत फर्निचर कारखान्यातील सर्व लाकडी साहित्य जळून खाक झाले. त्यासोबतच शेजारी असणारे गॅरेज व आणखी एक दुकानाचे नुकसान झाले. घटनास्थळी अग्निशमन दलाचे दोन ब्राउजर, दोन फायर गाड्या, एक देवदूत तसेच एअरफोर्सच्या तीन बंबाच्या साहाय्याने सुमारे दीड तासाने आग आटोक्यात आली. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास लोहगाव- वाघोली रोड येथील पेट्रोल पंपाजवळ असणाऱ्या खासगी जागेतील फर्निचर कारखान्याला आग लागली होती. घटनास्थळी तात्काळ येरवडा अग्निशमन दलाच्या फायर गाडीसह अग्निशमन अधिकारी सुभाष जाधव व येरवडा अग्निशमन विभागाचे कर्मचारी रवाना झाले. प्रत्यक्ष घटनास्थळी आगीचा प्रकार मोठा होता, त्यामुळे मदतीसाठी मुख्य अग्निशमन दलाच्या स्टाफ सह नायडू अग्निशमन केंद्र तसेच एअर फोर्स विभागाच्या अग्निशमन यंत्रणेची मदत घेण्यात आली. सुमारे दीड तासानंतर ही आग आटोक्यात आली. या आगीत फर्निचर कारखान्यातील सर्व लाकडी साहित्य जळून खाक झाले. त्यासोबतच शेजारी असणाऱ्या आणखी एक दुकानासह गॅरेजचे देखील नुकसान झाले आहे. सहायक अग्निशमन अधिकारी रमेश गांगड, स्टेशन ऑफिसर विजय भिलारे, केंद्रप्रमुख सुभाष जाधव यांच्यासह 20 ते 25 अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. विमानतळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्यासह पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपासाच्या सूचना दिल्या. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी आगीचा घटनेची नोंद घेतली असून नेमकी आग कशामुळे लागली याचा तपास पोलीस करीत आहेत.
लोहगाव येथील फर्निचर कारखान्याला आग; दीड तासाने आगीवर नियंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 4:41 PM
या आगीत फर्निचर कारखान्यातील सर्व लाकडी साहित्य जळून झाले खाक
ठळक मुद्दे20 ते 25 अग्निशमन दलाच्या जवानांनी आणली आग आटोक्यात