पुणे : उंड्री-पिसोळी रस्त्यावरील धर्मावत पेट्रोलपंपच्या पाठीमागे असणाऱ्या फर्निचर गोदामाला मंगळवारी (दि. २९) पहाटे सातच्या दरम्यान आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या वेळीच जागेवर पोचल्याने मोठा अनर्थ टळला.
कोंढवा बुद्रुक भागात असणाऱ्या उंड्री-पिसोळी रस्त्यावरील धर्मावत पेट्रोलपंपच्या मागे फर्निचर, प्रिटींग प्रेस व केमीकल बँलर असलेले गोदाम आहे. यामधील फर्निचरच्या गोदामाला पहाटे सातच्या दरम्यान आग लागल्याने गोदामातील सर्व लाकडी साहित्य, सोफा, फोम, कापूस जळून खाक झाले आहे. अग्निशमन दलाला फोन गेल्यानंतर याठिकाणी तातडीने कोंढवा बुद्रुक, हडपसर, कात्रज, सेंट्रल चे दोन पाणी टँकर व रुग्णवाहिका येऊन आग विझवण्यात आली. आगीवर त्वरीत नियंत्रण मिळवल्याने शेजारी असलेल्या केमिकल बँलर पर्यंत आग पसरली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आग लावली तेव्हा गोदामात कोणीही व्यक्ती नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच पेट्रोल पंप ५०० मी च्या अंतरावर असल्याने मोठा स्फोट टळला. यावेळी चालक तडवी, अग्निशमन दलातील अधिकारी प्रकाश गोरे,रामटेके ,चव्हाण व फायरमन अजित शिंदे, चौखंडे, पवार, भारती, यादव, शेख यांनी आग विजवण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे आग आटोक्यात आणता आली.