पुणे- शहरातील मार्केटयार्ड लगत असलेल्या आईमाता मंदिर परिसरातील एका फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग लागली. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास लागलेली ही आग अद्यापही आटोक्यात आलेली नाही. आगीची माहिती मिळाल्यानंतर फायर ब्रिगेडच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
फायरब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (सोमवारी) रात्री आठ वाजून 42 मिनिटांनी मार्केटयार्ड परिसरात आग लागल्याची माहिती देणारा कॉल आला होता. त्यानंतर फायर ब्रिगेडच्या काही गाड्या तत्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. आगीचे स्वरूप भीषण असल्याने एकूण 14 गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. या गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
गंगाधाम चौकापासून जवळच असलेल्या आईमाता मंदिरालगत हे फर्निचरचे गोडाऊन आहे. या गोडाऊन शेजारीच इतर आणखीनही काही गोडाऊन आहेत. ही आग इतरत्र पसरू नये यासाठीही फायर ब्रिगेडचे जवान प्रयत्न करतायत. गोडाऊनमध्ये लाकडी फर्निचर असल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यास अडचणी येत आहेत.