पुणे : शनिवारवाडाजवळील लाल महालासमोर असलेल्या सायकलच्या दुकानाच्या गोदामाला सोमवारी पहाटे भीषण आग लागली असून आगीच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याने ४ तासाच्या प्रयत्नांनंतरही अग्निशामक दलाच्या जवानांना आग विझविण्यात यश आले.
लाल महालासमोरील एक चार मजली इमारत असून तिचा तळमजल्यावर दुकाने आहेत तर वरचे मजले रहिवासी राहतात. इमारतीच्या बेसमेंटमध्ये त्यांनी दोन गोदाम काढली होती. त्यात सायकली व स्वेटर व इतर माल ठेवला होता. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास या बेसमेंटमधील गोदामाला मोठ्या प्रमाणावर आग लागली. तिचा धूर वर राहणाऱ्या लोकांच्या घरात गेल्याने त्यांना आग लागल्याचे समजले. मध्य वस्ती असल्याने अग्निशामक दलाच्या ६ गाड्या तातडीने घटनास्थळी पोहचल्या. मात्र, बेसमेंटमधून इतक्या मोठ्या प्रमाणावर धूर येत होता की, आग लागल्यानंतर दोन तासानंतरही जवानांना आगीच्या ठिकाणी पोहचणे अवघड होत होते. आग आतल्या आत धुमसत असल्याने त्यातून मोठ्या प्रमाणावर धूर येत आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी धूर काढण्यासाठी सर्किट ब्रेकर, बीए सेट, ब्लोअर कॉक्रिट हॅमरचा वापर करुन गोदामाच्या भिंती पाडल्या़ त्यानंतर त्यावर पाण्याचा मारा करुन आगीपर्यंत पोहचले.
दरम्यान, इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना टेरेसवर नेण्यात आले. दोन तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशामक दलाचे जवान आगीच्या जवळ पोहचू शकले. त्यानंतर पाण्याच्या मारा करुन आग विझविण्यात तब्बल चार तास झुंज द्यावी लागली. या आगीत दोन्ही गोदामातील सायकली, कपडे व पार्किंगमध्ये लावलेल्या गाड्या जळून खाक झाल्या.
पार्किंगचा बेकायदेशीरपणे वापर तेथे गोदामे काढल्याने आग विझविण्यात मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला.