महर्षी नगर : येथील मीनाताई ठाकरे वसाहतीतील औद्योगिक भागातील परफेक्ट बेकरीला सोमवारी दुपारी १२च्या सुमारास डिझेलवर चालणाऱ्या भट्टयांना आग लागून त्या भस्मसात झाल्या. यामध्ये एकूण १५ डिझेलवर चालणाऱ्या भट्टयांपैकी १३ आगीमध्ये पूर्णपणे जळून खाक झाल्या. तसेच बेकरी मधील असलेले ४० फुटी झाड आगीमध्ये जळून खाक झाल्यामुळे पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.परफेक्ट बेकरीला लागूनच दाट झोपडपट्टी असलेली मीनाताई ठाकरे वसाहत असून आग वसाहतीत पसरण्याचा धोका निर्माण झाला होता. दोन वर्षांपूर्वी येथे अशीच आगीची दुर्घटना घडली. यात २० झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या होत्या व सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे या घटनेचा धसका घेऊन परफेक्ट बेकरीला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर वसाहतीतील नागरिक घाबरून घराबाहेर पळाले. परंतु अग्निशामक दलाच्या कार्यतत्परतेमुळे बेकरीला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी कोंढवा, कात्रज व अग्निशामक दलाच्या मुख्य कार्यालयातून पाच अग्निशामक दलाच्या गाड्या व दोन पाण्याच्या टँकरच्या मदतीने अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवून परिस्थिती आटोक्यात आणली. या दुर्घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.या दुर्घटनेत परफेक्ट बेकरीच्या १३ डिझेल भट्ट्यांबरोबरच पत्र्याच्या शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
कारवाई का नाही?परफेक्ट बेकरीच्या विरूद्ध वसाहतीतील नागरिकांनी अनेक वेळा तक्रार करूनसुद्धा राजकीय वरदहस्तामुळे या बेकरीवर कारवाई होत नसल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. परफेक्ट बेकरीच्या आत कुठल्याही प्रकारच्या सुरक्षेच्या उपाययोजना राबवण्यात आल्याचे दिसून आले नाही. या बेकरीमध्ये जुन्या डिझेल टँकरच्या गाडीचा टँकर लावून त्यामध्ये अवैधरित्या डिझेल साठवणूक केली जात असल्याचे निदर्शनास दिसून आले.