धायरी : सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथील गोयल गंगा सोसायटी भागातील खाऊगल्लीत एका कचोरीच्या दुकानाला आग लागल्याने शेजारी असणाऱ्या इतर दोन दुकानांचेही आगीत नुकसान झाले असून ही घटना मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंगळवारी सकाळी श्री गजानन शेगाव कचोरी या माणिकबागेतील दुकानात नेहमीप्रमाणे कचोरी तयार करण्याचे काम सुरू होते. त्यावेळी सिलेंडर गळतीमुळे आग लागली आणि आगीने काही क्षणात बाहेर असणारे लाकडी फर्निचरला आपल्या विळख्यात घेतले. त्यामुळे आग आणखीनच भडकली. आगीच्या गरमीमुळे गळती होत असलेला सिलेंडरचा स्पोट झाला, आणि भडकलेल्या आगीने आसपासच्या दुकानांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सकाळी प्रत्यक्षदर्शीनी अग्निशामक दलाला आगीची कल्पना दिली. १० मिनिटात अग्निशामक दल पोचले व आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या कारवाईमध्ये सिंहगड अग्निशामक दलाचे तांडेल पांडुरंग तांबे, जवान सतीश डाखले, संजू चव्हाण, संदीप पवार, जरे यांनी आग विजवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
या आगीमध्ये साई प्रेमाचा चहा, श्री गजानन शेगाव कचोरी व द बेल्जियम वॉफल या दुकानांचे सुमारे ४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या पैकी द बेल्जियम वॉफल दुकानांचे आगीत एसी, फ्रीज आदी गोष्टींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तीन आठवड्यापूर्वी श्री गजानन शेगाव कचोरीची फ्रांचायझी घेतली होती. लाकडी फर्निचर यासाठी देखील खर्च केला होता. मात्र, आजच्या आगीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
- सुमित राऊत (हॉटेल चालक)