पुणे : पुणे शहरात गेल्या काही दिवसात आगीच्या घटनांचे प्रमाण वाढताना दिसते आहे. त्यामुळे शहरातील वर्दळीच्या भाग आणि अरुंद भागांचे फायर ऑडिट करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका आणि अग्निशमन विभागाला दिले आहेत.
टिंबर मार्केटमध्ये फर्निचर गोदामात भीषण आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. टिंबर मार्केटला आग लागल्याची घटना ताजी असतानाच; सोमवारी पुन्हा 4 घटना घडल्या. वारंवार घडणाऱ्या घटनांची दखल घेऊन, शहरातील वर्दळीच्या भागांचे तसेच अशा प्रकारच्या अरुंद भागांचे फायर ऑडिट करण्याचे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. टिंबर मार्केटसह इतर मार्केट शहराबाहेर नेता येतील का, याचा आराखडा तयार केला जाणार आहे. मात्र त्यास वेळ लागणार असल्याने तातडीची बाब म्हणून अशा वर्दळीच्या भागांचे फायर ऑडिट करून सुरक्षा उपाययोजना केल्या जाणार आहेत असे पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.