पुणे : दिवाळीमध्ये फटाके वाजवून आनंद साजरा केला जाताे. मात्र, निष्काळजीपणा केल्याने फटाक्यांमुळे आग लागण्याच्या घटनाही घडत असतात. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलानेही पूर्वतयारी पूर्ण केली आहे. आग लागल्याची वर्दी मिळताच घटनास्थळी धाव घेत ती तत्काळ अटाेक्यात आणण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. तसेच आगीची घटना घडू यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन अग्निशमन दलातर्फे करण्यात आले आहे.
पुणे महानगरपालिका अंतर्गत शहरातील वीस अग्निशमन केंद्रातील अधिकारी आणि अग्निशमन जवान असे सुमारे सातशे जणांचे मनुष्यबळ कार्यरत आहे. त्यामध्ये यंदा नव्याने नाेकरीत रूजू करून घेतलेले प्रशिक्षित अग्निशमन मदतनीस यांचाही समावेश असणार आहे. पुणे शहराचा विस्तार वाढण्यासाेबतच अग्निशमन केंद्रातही भर पडली आहे. पूर्वी मुख्यालयासह १४ अग्निशमन केंद्र हाेते त्यात आणखी सहा केंद्राची भर पडली आहे. तसेच मनुष्यबळही वाढविण्यात आले आहे. दरम्यान, दिवाळी सणामध्ये या सर्व केंद्रात कार्यरत असलेल्या मनुष्यबळाची सुट्टया रद्द करण्यात आल्या आहेत.
दिवाळीच्या चार दिवसामध्ये फटाके वाजविले जातात मात्र्, लक्ष्मीपुजनाच्या दिवशी रात्रीच्या वेळी माेठ्या प्रमाणात फटाके वाजविले जातात. दरवर्षी आग लागल्याप्रकरणी काॅल्स येण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे या दिवशी अग्निशमन यंत्रणेने पूर्ण क्षमतेनिशी सज्ज ठेवण्यात येते. आग लागल्यानंतर अग्निशमन नियंत्रण कक्षाच्या १०१ क्रमांकावर काॅल करून आग लागल्याच्या ठिकाणाची इमारत, गल्ली क्रमांक, परिसर, आणि त्या भागातील प्रसिध्द वास्तू्, दुकान, धार्मिक स्थळ आदी बाबतीत सविस्तर माहिती द्यावी. अनेकदा अपुरी माहिती दिल्याने अग्निशमन दलाची वाहन वेळेवर पाेहचण्यास विलंब हाेताे.
आग लागू नये यासाठी काय करावे?
अंगणात तसेच इमारतीजवळ कागद, प्लास्टिक तसेच झाडा झुडपांचा जमा झालेला कचरा वाळताे आणि त्यावर जळणारा फटाका पडून आग लागू शकते. त्यामुळे परिसराची स्वच्छता ठेवली पाहिजे. हवेत उडणारे फटाके काेसळून आग लागण्याची शक्यता लक्षात घेता इमारतीवर तसेच टेरेसमध्येही आग लागेल अशा वस्तू कपडे, कागद आदी वस्तू ठेवणे टाळले पाहिजे. इलेक्ट्रिक खांब, डीपी आणि तारेजवळ फटाके वाजवू नयेत अन्यथा इलेक्ट्रिक शाॅर्टसर्किट हाेउन माेठी आग लागू शकते. माेकळ्या जागेत फटाके वाजवावेत, सुती कपडे परिधान करावेत. उभ्या केलेल्या वाहनांजवळ फटाके वाजवू नयेत.
अशी घ्या लहान मुलांची घ्या काळजी
लहान मुलांमध्ये फटाक्यांबद्दल कुतुहल असते आणि फटाके वाजविण्यासाठी ते उत्साही असतात. मात्र, फटाके वाजविताना याेग्य लहान मुलांची काळजी घेणे नितांत गरजेचे आहे.
१. लहान मुले फटाके वाजवित असतील तर माेठ्या व्यक्तींनी त्यांच्या साेबत रहावे. तसेच सुरक्षिततेसंदर्भात माहिती द्यावी.
२. फटाके वाजवित असलेल्या ठिकाणापासून इतर फटाके दूर ठेवावेत.
३. आग तसेच माेठा आवाज असणारे शक्तीशाली फटाके लहान मुलांना वाजविण्यास देउ नये.
४. फटाके वाजविण्याच्या ठिकाणावर पाणी अथवा वाळू ठेवली पाहिजे म्हणजे किरकाेळ स्वरूपातील लागलेली आग तत्काळ अटाेक्यात आणता येईल.