लोकमत न्यूज नेटवर्क
यवत : पुणे-सोलापूर महामार्गलगत असलेल्या यवत येथील प्रसिद्ध ‘कांचन व्हेज’ हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत मुख्य इमारतीमधील विविध साहित्य, वस्तू जळून खाक झाल्या. मंगळवारी (दि. १) दुपारी ३ च्या सुमारास ही घटना घडली. हॉटेलच्या गॅस ठेवलेल्या भागात आग लागली. काही क्षणांत हॉटेलची मुख्य इमारत व किचनमध्ये ही आग पसरली. या घटनेत लाखो रुपयांचे साहित्य जाळून खाक झाले.
पुणे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या कांचन हॉटेलमध्ये आग लागल्याची घटना समजताच यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे व पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांनी व हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात आली नाही. अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. मात्र अर्धा तास उलटल्यानंतर देखील अग्निशामक दल घटनास्थळी आले नव्हते. यामुळे आगीत अर्ध्या तासात संपूर्ण इमारतीमधील लाकडी फर्निचरचे साहित्य व गवताळ भाग जळून खाक झाला. अर्धा ते पाऊण तास आगीचे आणि धुराचे मोठे लोट हवेत उंच जात होते.
तत्पूर्वी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान यवतमधील आबा प्रल्हाद दोरगे, अक्षय राऊत व त्यांचे मित्र कांचन हॉटेल येथे पार्सल घेण्यासाठी गेले होते. या वेळी त्यांना हॉटेलच्या मुख्य इमारतीच्या बाजूला असलेल्या खोलीतून धूर निघत असल्याचे दिसले. काही कळण्याच्या आत धुराचे रूपांतर आगीत झाले. आबा दोरगे, अक्षय राऊत व हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी तातडीने तेथे असलेले आठ ते दहा गॅस सिलिंडर बाजूला काढले. पोलीस कर्मचारी संपत खाबाले यांनी तातडीने अग्निशामक दलाला सर्वत्र फोन केले होते. संदीप दोरगे यांनी अग्निशामक दल येईपर्यंत गावातील तीन पाण्याचे टँकर आग विझविण्यासाठी आणले होते. मात्र, तोपर्यंत आगीने तीव्र स्वरूप धारण केले होते. सुदैवाने हॉटेलमधील सर्व कर्मचाऱ्यांना वेळेत बाहेर काढल्याने जीवितहानी झाली नाही.
जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम, यवतचे उपसरपंच सुभाष यादव, तलाठी कैलास भाटे, ग्रामविकास अधिकारी राजाराम शेंडगे आदी घटनास्थळी उपस्थित होते.
४ च्या सुमारास कुरकुंभ येथील औद्योगिक वसाहत, दौंड नगरपरिषद व पीएमआरडीएचे अग्निशामक बंब दाखल झाले. यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. तरी गॅसगळती झाल्याने आग लागल्याचे प्राथमिक अंदाज घटनास्थळी व्यक्त केले जात होता.
चौकट:
बघ्यांची गर्दी
घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. गावात कोरोनाच्या साथीत अनेकांचा बळी गेला तर कित्येक जण बाधित झाले होते. मागील काही दिवसांत कोरोनाची साथ काहीशी आटोक्यात आली असली तरी अजूनही कोरोना संपलेला नाही, याचे कसलेही भान नागरिकांना राहिलेले नव्हते. गर्दी वाढतच असल्याने पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी गर्दी करणाऱ्यांना दंडात्मक कारवाईची तंबी दिल्यानंतर काहीशी गर्दी कमी झाली. मात्र पोलिसांना सारखी गर्दी हटवावी लागत होती.
फोटो ओळ :- यवत येथील प्रसिद्ध कांचन व्हेज हॉटेलला लागलेली भीषण आग.