पुणे - आग लागलेली असताना झोपेतून जाग आली आणि मोठा अनर्थ टाळण्याची घटना पुण्यात बघायला मिळाली. त्यामुळे जाग आली नसती तर या विचारानेही कापरे भरत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,कोंढवा कात्रज रस्त्यावर बौद्ध विहार अपार्टमेंट मध्ये आज सकाळी एका घरामधे आग लागली. मात्र घरात असलेल्या मुलाची सावधगिरी व अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग विझवल्याने धोका टळला.
शहरातल्या बौद्ध विहार अपार्टमेंटमधे सकाळी पहिल्या मजल्यावर आग लागल्याने अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला रहिवाशी ऋषिकेश मोरे या पंधरा वर्षीय मुलाने सतर्कता दाखवित माहिती कळविली व कोंढवा(खुर्द) अग्निशमन वाहन व देवदूत क्विक रिस्पॉन्स टिम घटनास्थळी दाखल झाली. पहिल्या मजल्यावर असणाऱ्या घरामधे दुरचित्रवाणी संच, कपाट, वायरिंग व इतर घरगुती वापराच्या साहित्याने पेट घेतला होता. जवानांनी ताबडतोब घरामधे पाण्याचा मारा करत दहा मिनिटात आग पुर्ण विझवत आतमधे कोणी अडकले अथवा जखमी नसल्याची खात्री केली. त्याचवेळी तिथे असलेले जवान गणपत पडये यांची सतर्कता महत्वाची ठरली.त्या घरात भाडेकरु असलेला मुलगा ऋषिकेश मोरे (वय १५) याने सांगितले की, मी झोपलो असताना अचानक काहीतरी जळत असल्याचा वास आल्याने मी जागा झालो. तर घरातील वीज गेली असून काही वस्तू जळाल्याचे दिसले. म्हणून तातडीने अग्निशमन दलास माहिती कळविली व जवानांनी कामगिरी चोख बजावली. मला जाग आली नसती तर काहीतरी विपरित घडले असते अशी भावना ऋुषिकेशने व्यक्त केली.सदर कामगिरीमधे कोंढवा अग्निशमन केंद्राचे तांडेल सुभाष जाधव, गणपत पडये, चालक सुखदेव गोगावले, जवान संग्राम देशमुख, विशाल यादव आणि देवदूत क्विक रिस्पॉन्स टिमचे अंबादास घनवट, प्रदिप कोकरे, अविनाश लांडे सहभागी होते.