लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कात्रजमधील टेल्को कॉलनीतील एमएनजीएलच्या पाईपलाईनला मंगळवारी भीषण आग लागली. अग्निशामन दलाच्या तत्परतेमुळे ही आग वेळीच आटोक्यात आली. संभाव्य धोका टळल्याने स्थानिक रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.
कात्रज भागात सकाळी साडेअकराच्या सुमारास गॅस पाईपलाईनला आग लागली. हा प्रकार लक्षात आल्यावर जागरूक नागरिकांनी त्वरित अग्निशामक दलाशी संपर्क साधला. वर्दी मिळताच तीन मिनिटात अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. फोमचा वापर करत या पथकाने १० मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे वृत्त समजल्यावर 'एमएनजीएल'चेही पधक घटनास्थळी दाखल झाले होते.
एमएनजीएलच्या पाईपलाईनला लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशमनच्या तीन गाड्या बोलावण्यात आल्या होत्या. तब्बल अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग पूर्णपणे विझविण्यात यश आले. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही.