पुणे: गुलटेकडी परिसरातील मार्केट यार्डात फटाक्यांची आतषबाजी केल्याने एका गाळ्यातील कांद्याच्या गोण्यांना आग लागली. आगीची तीव्रता कमी असल्यामुळे आग नियंत्रणात आणणे शक्य झाले. त्यामुळे जीवीत हानी टळली. मात्र ,गर्दीच्या ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करणा-यांवर बाजार समितीकडून कारवाई होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. मार्केट यार्डातील एका आडत्याच्या वाढदिवसानिमित्त रविवारी भर बाजारात फटाक्यांची लांबच लांब माळ पेटवून आतषबाजी करण्यात आली. त्यामुळे तरकारी विभागात मोठ्या प्रमाणात धुर झाला. फटाके उडून जवळच्या एका कांदा विक्रेत्याच्या गाळ्यात गेले. त्यामुळे गाळ्यावरील कांद्याच्या गोण्यांना आग लागली. आगीची तीव्रता कमी असल्यामुळे ही आग तात्काळ विझविण्यात आली. मात्र, शेतक-यांच्या कांद्याचेही नुकसान झाले. फटाके उडून केवळ कांद्यावरच गेले नाहीत तर इतरही भाजीपाल्यांवर गेले. फटाक्यातील दारू आरोग्यास हानीकारक असते. त्यामुळे बाजाराच्या आवारात फटाके वाजवणे चूकीचे आहे. मात्र,विविध निवडणूकांच्या वेळी किंवा वाढदिवसानिमित्ताने अनेक वेळा बाजारात फटाके वाजविले जातात. परंतु, या सर्व प्रकाराकडे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून दुर्लक्ष केले जात आहे.
आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ म्हणाले,आनंद व्यक्त करण्यासाठी वाढदिवस साजरा करावा. मात्र, मोठ्या आवाजच्या फटाक्यांच्या माळा लावणे योग्य नाही.कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष दिलीप खैरे यांनी मात्र या प्रकारावर नाराजी प्रदर्शित केली असून संबंधित अडत्यांकडून खुलासा मागून योग्य कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले. बाजार आवारात वाढदिवसा निमित्ताने फटाके वाजविणे योग्य नाही असे सांगत फटाक्यांची आतषबाजीकरून बाजारात वाढदिवस साजरा करू नये याबाबत परिपत्रक काढून सर्व अडत्यांना दिले जाईल असेही ते म्हणाले. पुण्याची बाजारपेठ मोठी असल्यामुळे मार्केट यार्डात शेतमाल खरेदी विक्रीसाठी दररोज सुमारे ३० ते ४० हजार लोकांची वरदळ असते. गर्दीच्या वेळी फटाके वाजविल्यामुळे मोठा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, बाजार समितीकडून संंबंधितांवर कोणतीही कारवाई केली जात नाही.त्यामुळे बाजार समितीकडून फटाके वाजविण्यास प्रोत्साहन दिले जाते का? असा प्रश्न उपस्थित होतो.