थेऊर : थेऊर (ता. हवेली) येथील राईज अँड शाईन बायोटिक प्रा. लि. येथे आज सकाळी नऊच्या सुमारास मोठी आग लागून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. यात दोन नंबरची प्रयोगशाळा संपूर्ण जळून खाक झाली. आगीचे मुख्य कारण कळू शकले नाही; परंतु ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. येथे कुठलीही आगनियंत्रण यंत्रणा अथवा आपत्ती निवारण यंत्रणा नसल्याचे दिसून आले.राईज अँड शाईन बायोटिक प्रा. लि. येथे उती संशोधनाचे काम केले जाते. आज सकाळी नेहमीप्रमाणे आठ वाजता प्रयोगशाळेत काम चालू झाले. प्रत्येक प्रयोगशाळेत २०० महिलांची एक शिफ्ट असते. तीन शिफ्टमध्ये येथे काम चालते. येथे एकूण चार प्रयोगशाळा असून दोन नंबरच्या पीजीआरमधील चारमध्ये सकाळी सव्वानऊच्या सुमारास धूर निघताना दिसला. त्यानंतर सर्व कामगार महिलांना त्वरित बाहेर काढण्यात आले. या प्रयोगशाळेत सर्वत्र कापूस आणि थर्माकॉलचा वापर केलेला असल्याने आगीने रौद्ररूप घेतले.दरम्यान अग्निशामक यंत्रणेला पाचारण करण्यात आले; परंतु सुरुवातीला एकच बंब पोहोचल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे अवघड झाले. साडेदहानंतर आणखी पाच बंब पोहोचल्यानंतर आग विझविण्याच्या कामात वेग आला. स्थानिक नागरिकांना ही बातमी कळताच त्यांनीही मदतीसाठी धाव घेतली. आग लागल्यानंतर सर्व महिला कर्मचारी तसेच इतर कामगारांना सुरक्षित स्थळी आणण्यात आले. सर्व प्रयोगशाळांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला.आठ तासानंतर आग आटोक्यातशेजारी असलेल्या दुसऱ्या प्रयोगशाळेत आग पोहोचू नये, ही काळजी लागली होती. जेसीबीच्या साह्याने भिंती तोडून आत पाणी व फेस मिश्रणाचा फवारा करण्यात आला. तब्बल आठ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर पूर्ण नियंत्रण मिळविण्यात आले.आगीचे वृत्त समजताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, उपनिरीक्षक गणेश पिंगवले आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. तसेच, महसूल विभागाचे मंडल अधिकारी चंद्रशेखर दगडे, तलाठी दिलीप पलांडे, पोलीस पाटील रश्मी कांबळे घटनास्थळी लक्ष ठेवून होते.अग्निशामकचे एकूण सहा बंबांनी यात सहभाग घेतला. त्यामध्ये पुणे महापालिका तसेच पीएमआरडीए आणि हिंदुस्थान पेट्रोलियमच्या बंबांचा समावेश होता.
राईज अँड शाईन बायोटिकला कंपनीला आग; कोट्यवधीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 12:40 AM