पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीत आग; अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 3:06 PM
आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू: कोरोना लस तयार करणारा भाग सुरक्षित
पुणे: सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या, वॉटर टँक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनावरील कोविशील्ड लस तयार करणारा भाग सुरक्षित असून त्या ठिकाणी आग लागली नसल्याची माहिती सीरमनं दिली आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीमध्ये दुपारी २ च्या सुमारास आग लागली. मांजरी भागात असलेल्या इमारतीत बीसीजी विभाग आहे. या भागात बीसीजीची लस तयार करण्याचं काम चालतं. कोरोना लसीचं संशोधन आणि उत्पादनाचा विभाग या ठिकाणी नसल्याचं चिंतेची बाब नसल्याचं सीरमकडून सांगण्यात आलं. आग लागलेल्या भागात चार कर्मचारी अडकले होते. त्यापैकी तिघांची सुटका करण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळाकडे रवाना झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी दिली आहे. आग लागलेल्या भागात धुराचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे आग विझवण्यात अडचणी येत आहेत. आग नेमकी कुठे लागली आहे ते समजणं कठीण जात आहे. आग विझवल्यानंतर त्यामागील नेमकं कारण समजू शकेल, असं रणपिसे यांनी सांगितलं. आगीचे धुराचे लोळ खूप लांबवरुन दिसत असून परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे.जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी असा सिरम इन्स्टिट्यूटचा नावलौकिक आहे. काही दिवसांपूर्वीच सीरमने कोरोना प्रतिबंधक असलेली कोविशिल्ड लस देशभरात वितरणासाठी उपलब्ध करून दिली आहे. कोविशील्डच्या लसीकरणाची मोहीम देशात सुरू आहे. तसेच कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लस उत्पादन करण्यासाठी सीरम कंपनी प्रयत्नशील आहे.