पुणे : मांजरी येथील सिरम इन्स्टिट्यूट मध्ये एका इमारतीच्या चौथ्या व पाचव्या मजल्यावर २१ जानेवारी रोजी भीषण आग लागली होती.या आगीत इमारतीमधील ५ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता. ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अनेक तर्क- वितर्क लढवले जात होते. तसेच या आगीचे पडसाद थेट दिल्लीपर्यंत उमटले होते. या घटनेमागे काही घातपाताची शक्यता देखील वर्तविण्यात येत होती. या आगीचा पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या वतीने समांतर तपास करण्यात येणार होता. मात्र, सिरममध्ये लागलेली आग शॉर्टसर्किटमुळेच लागली असल्याची स्पष्ट माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि. १२ )दिली आहे.
पुण्यात अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, सिरम इन्स्टिट्युटला ज्या दिवशी आग लागल्याची घटना घडली. त्याचदिवशी मी घटनास्थळी भेट दिली होती. मात्र, ही शाॅर्ट सर्किटमुळेच आग लागली आहे. त्यामागे दुसरे काही कारण नाही.
सिरम इन्स्टिट्युटमध्ये सध्या कोरोनावरील 'कोविशिल्ड' लसीचे उत्पादन करण्यात येत आहे. ही लस देशभरात तसेच शेजारील राष्ट्रांमध्ये पुरविली जात आहे. त्याठिकाणी आग लागल्याने संपूर्ण जगभराचे लक्ष या आगीकडे लागले होते. केंद्रीय गृहमंत्रालयाने याची दखल घेऊन त्याबाबत चौकशी केली. सिरम इन्स्टिट्युटमधील आग लागण्याच्या घटनेची जगभरातून दखल घेण्यात आली. कोविशिल्ड लसीमुळे या आगीकडे घातपाताचा प्रकार तर नाही, अशी शंका व्यक्त केली गेली. त्यामुळे सुरक्षा एजन्सीसह गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. अगदी राष्ट्रपती कार्यालयापासून केंद्रीय संस्थांनी याबाबत विचारणा केली होती.