पुणे : बुधवार पेठेतील श्रीकृष्ण टॉकीजमध्ये खुर्च्या गॅस कटरने कापत असताना उडलेल्या ठिणग्याने आग लावून त्यात आतमधील सामान जळून खाक झाले़ बुधवार पेठेतील श्रीकृष्ण टॉकीजमध्ये गॅस कटरने खुर्च्या कापून काढण्याचे काम सुरू होते. येथील खालच्या खुर्च्या कापून काढण्यात आल्या होत्या. मात्र बाल्कनीतील खुर्च्या कापत असताना सायंकाळी चारच्या सुमारास आग लागली.
या आगीने शेजारील फोमच्या खुर्च्यांनी अचानक पेट घेतला आणि आग मोठ्या प्रमाणावर पसरली़ त्यानंतर काम करणारे लोक तेथून बाहेर पळाले. त्यांनी अग्निशामक दलाला याची माहिती दिली. कसबा अग्निशमन केंद्राचे तांडेल, अनिल करडे, राजाराम केदारी, हरीश बुंदेले, विठ्ठल अडारी, मंगेश मिळवणे, प्रकाश बुंदेले हे तेथे दाखल झाले. त्यांनी तत्काळ पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवले. संपूर्ण आग २० ते २५ मिनिटांत आटोक्यात आणली़ या आगीत आतील खुर्च्या, फोम, बाहेरून लावलेले फायबरचे पत्रे व इतर लाकडी वस्तू जळून खाक झाल्या.