पुणे : मांजरी येथे असणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटच्या एसईझेडमधील इमारतीच्या चौथ्या व पाचव्या मजल्यावर गुरुवारी दुपारी २ वाजून ३३ मिनिटांनी भीषण आग लागली. या आगीत इमारतीमधील ५ कामगारांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मात्र दुपारी लागलेली आग आता आटोक्यात आली आहे. सर्व प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहे. अद्याप आगीचे कारण अस्पष्ट आहे. उद्या पाहणी केल्यानंतरच ते स्पष्ट होणार आहे. तसेच नेमकी किती जीवितहानी झाली आहे हे सांगता येणार आहे. कुणी काही आरोप केले तरी राज्यातील जनतेने अजिबात घाबरून जाण्याचे कारण नाही.या घटनेची राज्य सरकारच्या विविध यंत्रणांमार्फत शहानिशा केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
अजित पवार यांनी रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची माहिती जाणून घेतली. यावेळी ते बोलत होते. या भेटीच्या वेळी हडपसर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख उपस्थित होते. पवार म्हणाले, सिरममध्ये आज दुपारी लागलेली आग आटोक्यात आली आहे. सर्व प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहे. मात्र अद्याप आगीचे कारण अस्पष्ट आहे. उद्या पाहणी होईल व कारण कळेल व किती जीवितहानी हे स्पष्टपणे सांगता येणे शक्य आहे. तसेच आग लागल्यानंतर सुरवातीच्या काळात या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र इमारतीमध्ये काम सुरु असल्याने ५ कामगारांचे पूर्णपणे जळालेले मृतदेह मिळाले आहे. यात हे पाचच मृत्यू असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यात दोन पुणे, एक बिहार, दोन उत्तर प्रदेशच्या कामगारांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या घटनास्थळाला भेट देणार आहे. मात्र ज्या ठिकाणी कोरोना लसची निर्मिती होत आहे तिथे काहीही नुकसान झालेले नाही. कोविशील्ड लस सुरक्षित आहे.इतर लस बनवण्यासाठी प्रयत्न केल जात होते त्या ठिकाणी ही आग लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या इमारतीच्या पहिल्या, दुसऱ्या मजल्यावर आले होते त्याच इमारतीच्या वरच्या मजल्याला आग लागली आहे. फायर ऑडिट व इतर टीम आग लागलेल्या ठिकाणी भेट देणार असून माहिती घेणार आहे. येथे आता सुरक्षा आहे आणि काही पोलिस देखील असणार आहे, असेही पवार यावेळी म्हणाले.
उपमुख्यमंत्र्यांनी केले अग्निशामक दलाचे कौतुक.. पाणी मुबलक होते. पण आग भडकल्यामुळे अग्निशामक दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागले. तसेच पाण्याच्या काही ठिकाणी काचा फोडून आत प्रवेश करावा लागला. अग्निशामक दलाने भीषण आगीवर मिळवलेले नियंत्रण हे कौतुकास्पद आहे. आत पूर्ण अंधार होता. पण उद्या याविषयी सर्व माहिती घेउन कारण काय आहे हे स्पष्ट होईल. या घटनेची नियमावलीनुसार सर्वकाही तपासले जाणार असल्याचे देखील पवार यांनी यावेळी सांगितले.