पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भुगोल विभागाच्या समोरील जंगलाला लागलेल्या आगीत अनेक झाडे व झुडपे जळून खाक झाली. शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला. या आगीमुळे विद्यापीठ कॅम्पसमध्ये सर्वत्र मोठयाप्रमाणात धूर पसरला होता. या आगीचे कारण कळू शकलेले नाही.
विद्यापीठ कॅम्पसमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळयाच्या मागे विस्तीर्ण जंगल आहे. त्यामध्ये अनेक झाडे झुडपे आहेत. इथे झाडांना शनिवारी सायंकाळी अचानक आग लागली. जंगलातून मोठया प्रमाणावर धुराचे लोट बाहेर पडायला लागल्यानंतर अग्निशमन दलास याची माहिती देण्यात आली. अग्निशमन दल पोहचेपर्यंत विद्यापीठातील सुरक्षा रक्षकांनी आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. अग्निशमनची गाडी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र तोपर्यंत आगीत अनेक झाडे जळून खाक झाल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र ही आग चुकून लागली की कुणाकडून लावण्यात आली याची चौकशी करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून चतु:श्रृंगी पोलिसांकडे तक्रार देण्यात येणार आहे.