चाकण (पुणे) :पुणे- नाशिक महामार्गावर चाकण (ता. खेड) येथील तळेगाव चौकामध्ये नाशिक बाजूकडून पुणेकडे जाणारी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची शिवशाही एसटीला (एम एच ०९ ई एम २६०७) आज शनिवारी (दि.१७) रोजी दुपारी साडेअकराच्या सुमारास अचानक आग लागली होती.
पुणे-नाशिक महामार्गावरील चाकणच्या तळेगाव चौकात शिवशाही बस पुण्याकडे जात असताना एसटीच्या मागील बाजूच्या टायरजवळ आग लागल्याची बाब निदर्शनास येतात. बस रस्त्याच्या बाजूला घेऊन सर्व प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आले. जवळील वाहतूक शाखेच्या पोलिसांनी तातडीने धाव घेऊन एसटी बसमधील पंचवीस प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत केली. त्यानंतर अवघ्या काही क्षणात चाकण अग्निशमन दलाचा अग्निबंब घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले.
सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र महामार्गावर घडलेल्या घटनेमुळे रस्त्याच्या दुतर्फा खूप मोठी वाहतूककोंडी झाली होती. घटनस्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. संबंधित एसटीच्या चाकांचे ड्रम लायनर गरम होऊन टायरने पेट घेतल्याचे सांगण्यात आले.