लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहर आणि जिल्ह्यातील ७३४ खासगी व सरकारी रुग्णालयांपैकी आतापर्यंत ७०७ रुग्णालयांनी आपले फायर ऑडिट पूर्ण केले आहे. अद्यापही २८ हाॅस्पिटल बाकी आहे. काही रुग्णालये जिल्हा प्रशासनाने स्थापन केलेल्या पथकांना फायर ऑडिट करण्यास विरोध करत आहेत. याबाबत नुकत्याच झालेल्या जिल्हा कोरोना आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फायर ऑडिटला विरोध करणाऱ्या रुग्णालयांच्या विरोधात थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.
राज्यात काही दिवसांत काही रुग्णालयांमध्ये शाॅर्टसर्किट होऊन झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व खासगी व सरकारी रुग्णालयांचे फायर ऑडिटचे आदेश दिले. यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील स्वतंत्र समिती स्थापन केली. या समिती मार्फत सर्व रुग्णालयांचे ऑडिट सुरू आहे. पण, काही खासगी रुग्णालयांनी समितीला रुग्णालयांमध्ये येण्यास व फायर ऑडिट करण्यास विरोध केला. याबाबत शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत चर्चा झाली. काही रुग्णालये जिल्हा प्रशासनाच्या पथकाला येऊ देत नसल्याचे सांगितले.
पुणे शहर, पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कॅन्टोन्मेंट हद्दीसह जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या खासगी रुग्णालयांनी तथा सरकारी रुग्णालयांनी आग प्रतिबंधक व जीवसंरक्षण उपाययोजना कलम ३ पोटकलम मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे, रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या रुग्णालयांच्या मध्ये बसविलेल्या आग प्रतिबंधक उपाययोजनांचे अग्निशमन लेखापरीक्षण मान्यताप्राप्त ‘अ’, ‘ब’, किंवा ‘क’ या फायर लायसन्स एजन्सीकडून करून सर्व आवश्यक अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित व सुस्थितीत ठेवाव्यात. तसेच लेखापरीक्षणात आढळून आलेल्या त्रुटींची पूर्तता पंधरा दिवसांत करावी. त्यासंबंधीचा कार्यपूर्ती अहवाल संबंधित आपल्या कार्यक्षेत्रात येणाच्या मुख्य अग्निशमन अधिकारी यांना करावा. त्याचबरोबर अग्निशमन यंत्रणेसोबतच रुग्णालयांच्या संपूर्ण विद्युतबाबतचे स्वतंत्र लेखापरीक्षण करण्यात यावे, असे देखील आदेश दिले आहेत.
--
जिल्ह्यातील रुग्णालयांची फायर ऑडिटची माहिती
क्षेत्र कोविड रुग्णालय फायर ऑडिट शिल्लक
पुणे महापालिका १९२ १८७ ०५
पिंपरी-चिंचवड १३३ १३३ ००
ग्रामीण शासकीय १२२ १२२ ००
ग्रामीण खासगी २७६ २५३ २३
कॅन्टोन्मेंट ११ ११ ००
एकूण ७३४ ७०३ २८