नेहरूनगर : संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रुबी केअर विभागात शॉर्टसर्किट होऊन आग लागली. परंतु सुरक्षारक्षक व वॉर्डबॉय यांच्या तत्परतेने फायरस्टेशनच्या साहाय्याने तातडीने आग विझवण्यात आली. ही घटना सोमवारी सकाळी ८.३० च्या सुमारास घडली.मिळालेल्या माहितीनुसार, चव्हाण रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर रुबी केअर हा विभाग आहे. सोमवारी सकाळी ८.३० च्या सुमारास वायर जळण्याचा उग्र वास सुरक्षारक्षकाला आला. वास कोठून येतो आहे याचा शोध घेतला असता, रुबी केअर विभागातील वातानुकुलित व इंटरनेटच्या वायरी शॉर्टसर्किटमुळे जळत असल्याचे त्यांना दिसले. सुरक्षारक्षक दिनेश चौटालिया, भूषण पाटील, वॉर्डबॉय राकेश शिंदे, सुरेश मोरे यांनी तत्परतेने रुग्णालयामध्ये असलेल्या फायरटेशनच्या साहाय्याने आग विझवली. यामुळे संभाव्य दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान रुग्णालयात दाखल झाले. तोपर्यंत आग विझवण्यात आली होती. अचानक आग लागल्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ उडाली. (वार्ताहर)
‘वायसीएम’मध्ये आग; मोठी दुर्घटना टळली
By admin | Published: April 21, 2015 3:00 AM