चिखली : भंगार दुकानाला लागलेल्या आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केल्याने आगीचे तांडव पसरल्याची घटना चिखलीतील कुदळवाडी येथे मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. या भीषण आगीत सुमारे २५ भंगार दुकाने खाक झाली. वाऱ्यामुळे पसरलेल्या आगीवर अग्निशामक दलाला नियंत्रण मिळविण्यास तब्बल पाच तासांहून अधिक कालावधी लागला.कुदळवाडी परिसरात मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास एका भंगार दुकानाला अचानक आग लागली. काही क्षणांत ती पसरली. दाटीवाटीने असलेल्या भंगार दुकानांनी पेट घेतला. बघता बघता कुदळवाडी परिसर आगीच्या ज्वाळांनी वेढला गेला. भर दुपारच्या रखरखत्या उन्हात पसरलेल्या आगीने कुदळवाडी परिसरातील दुकानदार, व्यावसायिकांंची तारांबळ उडाली. सर्वत्र धावाधाव सुरू झाली. या दुर्घटनेत मोठी वित्तहानी झाली असून, सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही.घटनेची माहिती मिळताच पिंपरी, रहाटणी, भोसरी, प्राधिकरण येथून महापालिकेच्या अग्निशामक केंद्राचे प्रत्येकी एक असे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवीत असताना शेजारीच असलेल्या लाकडाच्या वखारीपर्यंत आग पसरली. आगीने अधिकच रौद्र रूप धारण केले. मोठ्या प्रमाणावर धुराचे लोळ पसरल्याने परिसरातील नागरिकांची धावपळ उडाली होती. धुराच्या लोळामुळे अग्निशामक दलाच्या जवानांना अडचणींचा सामना करावा लागला. वाऱ्यामुळे आगीने अधिकच रौद्र रूप धारण केले. बंबांची कमतरता जाणवू लागल्याने, परिसरातील खासगी कंपन्यांचे बंबही दाखल झाले होते. सुमारे पाच तासांच्या अथक प्रयत्नांनतर सायंकाळी सहाच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशामक विभागाला यश आले. यासाठी सुमारे १८ बंब लागले. स्फोटाचे स्वरूपकुदळवाडीतील आगीच्या घटनेत हवेत पसरलेले धुराचे लोळ, दिसणाऱ्या आगीच्या ज्वाळांनी जणू काही स्फोटच घडून आला आहे, अशी परिस्थिती मंगळवारी पाहावयास मिळाली. सुदैवाने या घटनेत जीवित हानी घडली नसली, तरी गंभीर व धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती. कशाही पद्धतीने उभारलेली शेड, त्यात मर्यादेपेक्षा अधिक भरून ठेवलेला भंगार माल अशी स्थिती कायमच कुदळवाडीत असते. उपाययोजनांची आवश्यकताआपत्कालीन स्थिती ओढवल्यास मदतकार्यसुद्धा पोहोचू शकणार नाही, याचीही प्रचिती आगीच्या बंबांना नेताना आलेल्या अडथळ्यांमुळे मंगळवारी अनुभवास आली. आगीच्या घटनेने स्फोट भासविणारी परिस्थिती कुदळवाडीत नागरिकांना पाहावयास मिळाली. कुदळवाडी परिसरात वारंवार आग धुमसत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. भविष्यात मोठी दुर्घटना घडू नये, याकरिता कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
आगीचे तांडव; भंगाराची २५ दुकाने खाक
By admin | Published: February 24, 2016 3:27 AM