पुणे: शहरात झाडपडी, आग, वाडे - इमारती कोसळणे अशा अनेक घटना घडल्यावर अग्निशमन दलाचे जवान तातडीने धावून येतात. स्वतःच्या जीवाची परवा न करता सर्वांना संकटातून बाहेर काढण्यासाठी खंबीरपणे उभे असतात. माणसासोबतच मुक्या प्राण्यासाठीसुद्धा त्यांची धावपळीची तयारी दिसून येते. अशाच घटनेत आज सकाळी अग्निशमन दलाच्या जवानांना मार्केटयार्ड येथे एक कुत्रे संकटात असल्याची माहिती मिळाली. येथे शिवाजी पुतळ्याजवळ कुत्र्याच्या तोंडात प्लास्टिक डबा अडकला होता. जवानांनी त्याच क्षणी घटनास्थळी पोचून कुत्र्याची या डब्यातून सुटका केली.
सकाळी पावणे आठच्या सुमारास अग्निशमन दलाला कॉल आला होता. स्थानिक रहिवाशांनी कुत्र्याच्या तोंडात प्लास्टिक डबा अडकल्याची माहिती दिली. त्यानंतर फायर ब्रिगेड 2 आणि देवदूत चे 2 असे चार जवान घटनास्थळी दाखल झाले. कुत्र खूपच घाबरले होते. त्याच्या हालचालीमुळे जवानांना डबा काढण्यात अडचणी येऊ लागल्या. अशा परिस्थितीत कुत्र्याच्या तोंडापासून मागे नेट ( जाळी ) लावण्यात आली.
दोन जवानांनी व्यवस्थितरित्या त्याला धरले. कात्री आणि कटरचा वापर करून डबा एका बाजूने कापण्यास सुरुवात केली. कुत्र्याला कात्री लागणार नये याची ते दक्षताही घेत होते. अखेर डब्याच्या दोन्ही बाजूने कापून त्याची सुखरूप सुटका केली. यावेळी घटनास्थळी दिगंबर बांदवडेकर, राजेश कांबळे, परेश जाधव आणि चंद्रकांत मेनसे या जवानांनी अथक परिश्रम घेतले.