पिंपरी : विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) अग्निशामक दल कर्मचारी उद्या मंगळवारी लाक्षणीक संप करणार आहे. यामध्ये एमआयडीसी पिंपरी-चिंचवडमधील अग्निशामक दलाचे कर्मचारी सहभागी होणार आहेत. एमआयडीसीचे राज्यामध्ये २६ अग्निशामक दल आहेत. तेथे मनुष्यबळ कमी असल्याने कर्मचाऱ्यांना ८ तासांपेक्षा अधिक काम करावे लागत आहे. त्याचा मोबदला मिळत नाही. अतिकालीन भत्ता दिला जात नाही. या प्रकारे कर्मचाऱ्यांकडून अमानवी पद्धतीने अतिरिक्त काम करून घेतले जात आहे. यांच्या विरोधात लक्ष वेधण्यासाठी एमआयडीसी कर्मचारी महासंघाने लाक्षणीक संप पुकारला आहे. सततच्या अनियमितपणे होणाऱ्या बदल्या बंद कराव्यात. कामाच्या ठिकाणी कौटुंबिक सदनिकांचा अभाव असल्याने घरभाडे भत्ता दिला जावा. अपघात विम्याची सुविधा दिली जावी. नियमितपणे वेतनात वाढ आणि भविष्य निर्वाह निधीचे संकलन व्हावे. तसेच, बोनस अनुदान वेळेवर दिले जावे. नियमितपणे पदोन्नती केली जावी आदी मागण्यांसाठी आंदोलन केले जाणार आहे. (प्रतिनिधी)
अग्निशामक दल कर्मचाऱ्यांचा आज संप
By admin | Published: May 05, 2015 3:07 AM