शिरूर : शिक्रापूर ( ता. शिरूर) येथील यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र करंजे यांच्यावर गुरुवारी (दि. ५ एप्रिल ) पहाटेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी लांबविली असल्याची घटना घडली आहे. याबाबत राजेंद्र भालचंद्र करंजे (वय ४६ रा. शिक्रापूर ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी यात्रेत कुस्त्यांचा आखाडा आणि त्यानंतर रात्री तमाशाचा कार्यक्रम होता. करंजे यात्रा कमिटीच्या सदस्यांसोबत तमाशा पाहत होते. रात्री अडीचच्या सुमारास करंजे यांना झोप येऊ लागल्याने ते झोपण्यासाठी घरी गेले. घराजवळ गेल्यानंतर ते मनाली हॉटेल समोर दुचाकी उभी करत असताना अचानक दुचाकीवरून तिघे जण आले त्यातील पाठीमागे बसलेल्या एकाने करंजे यांच्यावर पिस्तुलमधून तीनवेळा गोळ्या झाडल्या. या गोळीबारात करंजे हे गंभीर जखमी झाले. यावेळी करंजे यांनी आरडाओरडा केल्याने शेजारील दोघेजण त्याठिकाणी आले असता हल्लेखोरांनी करंजे यांच्या गळ्यातील सोन्याची चैन ओढली. मात्र, हातातील सोन्याचे कडे त्यांना काढता आले नाही. तोपर्यंत शेजारील दोघेजण आल्याने हल्लेखोर दुचाकीवरून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणी दोन पुंगळ्या आढळून आहे. या गोळीबारात करंजे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वाघोली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे हे करत आहे.
गोळीबार करून सोन्याची साखळी पळवली,शिक्रापूर येथील धक्कादायक घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 3:13 PM
शिक्रापूर ( ता. शिरूर) येथील यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र करंजे यांच्यावर आज पहाटेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी लांबविली असल्याची घटना घडली आहे.
ठळक मुद्देराजेंद्र भालचंद्र करंजे शिक्रापूर येथील यात्रा कमिटीचे अध्यक्ष