पुणे : पूर्ववैमनस्यातून सराईत गुंडाच्या टोळीने बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाचा पाठलाग करून त्याच्यावर गोळीबार करण्याची घटना मध्यरात्री हांडेवाडी रोडवर घडली़ याप्रकरणी हडपसर पोलिसांनी सराईत गुन्हेगार टिपू पठाण व त्याच्या १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे.
सद्दाम सलील पठाण (वय २४) आणि इजाज पठाण (रा़ सय्यदनगर, वानवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़ इजाज हा सराईत गुन्हेगार टिपू पठाण याचा भाऊ असून तो सिक्युरिटी सर्व्हिस एजन्सी चालवितो़ याप्रकरणी नीलेश शेखर बिनावत (वय २५, रा. सातवनगर, कंजारभाट वस्ती, हडपसर) याने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश आणि त्याचे मित्र विवेक गोंडावत, विनायक बिनावत, विकी बिनावत, रोहन कचरावत हे शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता सय्यदनगर भागातील एका पानपट्टीजवळ थांबले होते. त्यावेळी टिपू पठाण तेथे आला. मला ओळखत नाही का?, अशी विचारणा केली.ओळखत नसल्याचे सांगितल्यावर त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यात रोहन करजावत जखमी झाला़ त्यानंतर नीलेश आणि त्याचे मित्र तेथून पळाले. सातवनगर परिसरातील रहिवाशांना माहिती दिली. त्यानंतर बैजू बिनावत, भारत बिनावत, विवेक गोंडावत आणि काही जण सय्यदनगर भागात जाब विचारण्यासाठी गेले. त्यांच्याकडे तलवार व तीक्ष्ण शस्त्रे होते. त्यांनी सय्यदनगर भागात दहशत निर्माण केली. तेथील गाड्यांची मोडतोड केली़ या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस तातडीने तिथे गेले़ पोलिसांना पाहून ते हातातील शस्त्रे व वाहने टाकून पळून गेली़ आपल्या भागात येऊन नीलेश व त्याच्या साथीदारांनी राडा घातल्याची माहिती मिळाल्यावर टिपू व त्याचे साथीदार नीलेशचा शोध घेऊ लागले़दुचाकीवरुन १५ ते २० जणांचे टोळके सातवनगर परिसरात आले. नीलेशने त्यांना पाहिले. टिपू आणि त्याचे साथीदार वाहनांची तोडफोड करतील, अशी भीती नीलेशला वाटल्याने तो मोटार बंगल्यात नेत होता. त्यावेळी टिपूने त्याच्यावर पिस्तूल रोखले आणि शिवीगाळ केली. तेव्हा नीलेश मोटार वेगाने घेऊन जाऊ लागला़ टिपू आणि त्याचे साथीदार मागावर असल्याचे समजताच नीलेशने मोटार हडपसर पोलीस ठाण्याच्या दिशेने नेली. टिपूने मोटारीवर ४ गोळ्या झाडल्या़ ३ गोळ्या मोटारीच्या दरवाज्यावर लागल्या. नीलेश घाबरलेल्या अवस्थेत हडपसर पोलीस ठाण्यात पोहचला आणि या घटनेची माहिती दिली. पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल तांबे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि तातडीने तपास सुरु केला.तडीपार करण्याचा प्रस्तावच्टिपू पठाणविरोधात खून, खुनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याने समाजमाध्यमावर काही चित्रफीत टाकल्या आहेत. काही वर्षांपूर्वी पोलिसांनी त्याच्याविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई केली होती. या प्रकरणात त्याने न्यायालयाकडून जामीन मिळवला आहे. त्यानंतर टिपूने पुन्हा दहशत निर्माण केली. त्याला शहरातून तडीपार करण्याचा प्रस्ताव वानवडी पोलिसांकडून करण्यात आला आहे.