धायरी : व्हॉट्स ॲप ग्रुपवर झालेल्या चॅटिंगवरून झालेल्या बाचाबाचीत एका बांधकाम व्यावसायिकाने एकावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. विशेष म्हणजे गोळीबार झालेल्या ठिकाणापासून सिंहगड पोलीस ठाणे हे हाकेच्या अंतरावर आहे. यात रमेश राठोड (रा. वारजे, पुणे) हे जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी संतोष पवार (रा. बावधन, पुणे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेली माहिती अशी की, संतोष पवार, देवा राठोड व रमेश राठोड यांच्यासह अन्य काहीजण सिंहगड रस्ता परिसरातील सनसिटी भागातील योगीराज ऑटो सेंटरमध्ये चर्चा करीत होते. यातील देवा राठोड यांनी त्यांच्या समाजाच्या व्हॉट्सॲप ग्रूपवर संतोष पवार यांच्याबद्दल काहीतरी लिहिले होते. यावरून संतोष पवार व देवा राठोड यांच्यात बाचाबाची झाली. या भांडणात रमेश राठोड हे मध्ये पडल्याने संतोष पवार यांनी कमरेला असणारी पिस्तूल काढून रमेश राठोड यांच्या दिशेने गोळीबार केला. यात रमेश राठोड यांच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता विभागाचे सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जयंत राजुरकर व कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत.
पोलीस संरक्षण असताना केला गोळीबार...
संतोष पवार हे बांधकाम व्यावसायिक असून ते जमीन विकसक म्हणून काम करतात. त्यांच्याकडे परवाना असलेले पिस्तूल असून त्यांच्या संरक्षणासाठी एक पोलीस कर्मचारी सुद्धा आहे. मात्र असे असतानाही त्यांनी रमेश राठोड यांच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे.