लोणी काळभोर : एटीएममधून पैसे काढताना अज्ञानाचा फायदा घेऊन एका अज्ञात इसमाने सेवानिवृत्त नागरिकास ३ लाख ५८ हजार रुपयांचा गंडा घालण्याची घटना तब्बल एक महिन्याने उघडकीस आली आहे.भानुदास चंदर कुंजीर (वय ५८, रा. वळती, ता. हवेली, जि. पुणे) यांची फसवणूक करण्यात आलेली असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते रेल्वे खात्यात गेटमन म्हणून काम करत होते. मे महिन्यात सेवानिवृत्त झाल्यानंतर मिळालेली सेवानिवृत्ती फंड व इतर सर्व रक्कम त्यांनी उरुळी कांचन येथील एसबीआय बँकेतील बचत खात्यात ठेवली होती. त्यानंतर त्यातील रक्कम ते एटीएमचा वापर करून घर व शेतीखर्चासाठी काढत. त्यांना एटीएम कार्डचा वापर करता येत नसल्याने पैसे काढावयाचे असतील तेव्हा प्रत्येकवेळी ते आपल्या मुलांना बरोबर नेत असत.२६ नोव्हेंबर रोजी त्यांचा मुलगा याने सहज आपल्या वडिलांचा मोबाईल घेऊन त्यातील मेसेज पाहिले असता त्याला १८ डिसेंबर रोजी खात्यातून ३ लाख ६० हजार रुपये काढलेले दिसले. याबाबत त्याने वडिलांकडे विचारणा केली असता, त्यांनी आपण त्या व्यक्तीकडून फक्त दोन हजार रुपये काढून घेतल्याचे सांगितले. स्वप्निल याने एटीएम कार्ड पाहिले असता, ते व्ही. मल्लिकार्जुन या नावाचे होते. सर्व चौकशी करून आपली ३ लाख ५८ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, त्यांनी १९ डिसेंबर रोजी तक्रार नोंदवली. (वार्ताहर)
गंडा घातल्याची घटना एक महिन्याने उघडकीस
By admin | Published: December 21, 2015 12:41 AM