पुणे : आनंदनगर परिसरात बांधकाम व्यावसायिकाने केलेल्या गोळीबाराने सिंहगड रोड परिसरात खळबळ उडाली होती. बंजारा समाजाचे संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात कोण सर्वात जास्त वर्गणी देणार यावरून व्हाॅट्सॲप ग्रुपवर वाद सुरू होता. या वादातून हा गोळीबार झाला. त्याला आता आणखी एक नवे वळण मिळाले असून, त्यात गोळीबार करणाऱ्या व्यावसायिकाकडून खंडणी वसूल केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत संतोष सेवू पवार (३५, रा. बावधन) यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रमेश बद्रिनाथ राठोड आणि देवा ऊर्फ देवीदास सोमनाथ राठोड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. देवा राठोड याला अटक केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक कादबाने तपास करीत आहेत.
खंडणीच्या वादात आरोपीने केली होती मध्यस्थी
वेल्हा पोलिस ठाण्यात २०१५ मध्ये रोहिदास चोरगे याच्या विरुद्ध या फिर्यादीने खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. भविष्यात त्रास होऊ नये, याकरिता रमेश राठोड याला फिर्यादीने मध्यस्थी करण्यास सांगितले. त्यानुसार राठोड याने मध्यस्थी केली. याबदल्यात जुलै २०१५ पासून आजपर्यंत तो वेळोवेळी भेटून पैशांची मागणी करत होता. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून ५ ते ६ लाख रुपये रोखीने वसूल केले. मंगळवारी रात्री गोळीबार झाला, त्यावेळी आरोपींनी या व्यावसायिकाकडे पैशाची मागणी करून हाताने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.