वाकड : मित्रांना भेटायला पुनावळेत निघालेल्या रिअल इस्टेट एजंटवर अज्ञात आरोपीने गोळी झाडली. या जीवघेण्या हल्ल्यात एजंटने प्रसंगावधान राखत गोळी चुकविण्याचा प्रयत्न केला. गोळी मांडीला लागली. त्यात जखमी झाले. ही घटना ताथवडे येथे शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. हरिओम मेहरसिंग सिंग (वय ३०, रा. कुमार पॉपीलॉन सोसायटी, सुतारवाडी पाषाण, मूळ राजस्थान) असे हल्ल्यात जखमी एजंटचे नाव आहे. तीन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत वाकड ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांनी दिलेली माहिती अशी - फिर्यादी सिंग हे रात्री साडेअकराच्या सुमारास पुनावळेतील मित्र अशोक प्रजापती व अंजुल यांना आपल्या मोटारीने (एमएच १० सीए ७००७) भेटायला निघाले होते. ताथवडे येथील सेवा रस्त्यावर असलेल्या एका हॉटेलजवळ त्यांनी मोटार थांबविली. त्या वेळी मोटारीचे दरवाजे उघडून तीन अज्ञात इसम मोटारीत बसले. त्यातील एकाने त्याच्याकडील बंदूक काढत फिर्यादीच्या पोटाला लावली. ‘मोटार पुढे घे’ असे धमकावले. फिर्यादीने काय झाले, असे विचारले असता, ‘तुला मरायचे आहे का?’ अशी धमकी त्यांनी दिली. त्यामुळे फिर्यादी घाबरले. प्रसंगावधान राखत ते हॉटेलच्या दिशेने पळू लागले. त्याच वेळी वाचवाऽऽ वाचवाऽऽ अशी आरोळी दिली. त्या वेळी आरोपींनी त्यांचा पाठलाग केला. त्यातील एका बुटक्या व्यक्तीने बंदुकीची गोळी फिर्यादीच्या दिशेने झाडली.>गोळीबारात सिंग गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वाकड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ला कशासाठी झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सिंग यांनी वाकड पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
रिअल इस्टेट एजंटवर गोळीबार; मांडीला गोळी लागल्याने जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 2:32 AM