पुणे : रस्त्याच्या जुन्या वादातून दोघा भावांनी गोळीबार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना खांदवेनगर लोहगाव येथे बुधवारी रात्री घडली. या घटनेत मधुकर दत्तात्रय खांदवे (वय ५४ ,रा.खांदवेनगर,लोहगाव) हे जखमी झाले असून गोळीबार करणाऱ्या अभिजित बाळासाहेब शेजवळ व सुरज बाळासाहेब शेजवळ या दोघांना गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक गजानन पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास खांदवेनगर लोहगाव येथे गोळीबार झाल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून विमानतळ पोलिसांना देण्यात आली होती. घटनास्थळी तात्काळ विमानतळ पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी रवाना झाले. याठिकाणी राहणारे मधुकर खांदवे यांच्यावर अभिजित व सुरज शेजवळ या दोघा भावांनी साथीदारांच्या मदतीने गोळीबार केल्याचे समजले. खांदवे यांच्यावर आरोपींनी दोन गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी त्यांच्या डोक्याला चाटून गेली. त्यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वहिवटिच्या रस्त्याच्या वादातून हा प्राणघातक हल्ला केल्याची माहिती फिर्यादी मधुकर खांदवे यांनी फियार्दीत दिली. घटनास्थळी पोलिसांना एक जिवंत काडतुस, एक पुंगळी,फायर झालेला बुलेटचा तुकडा हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी अभिजित व सूरज शेजवळ यांना विमानतळ पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. घटनास्थळी अपर पोलिस आयुक्त सुनील फुलाची, पोलिस उपायुक्त पंकज देशमुख, सहाय्यक पोलिस आयुक्त रामचंद्र देसाई यांच्या सह गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक जे. सी. मुजावर करत आहेत.
रस्त्याच्या जुन्या वादातून लोहगावात गोळीबार, दोन आरोपी ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 1:28 PM