पुणे : शहरातील गर्दीच्या प्रमुख ठिकाणांपैकी एक असलेल्या मॉल, मल्टिप्लेक्समध्ये अपघात झाल्यास, एखाद्याला दुखापत झाल्यास त्याला तातडीने आणि आवश्यक ते प्रथमोपचार मिळू शकणार नाहीत. कारण या मॉल्स व मल्टिप्लेक्समध्ये ‘प्रथमोपचार पेट्या’ या केवळ नावापुरत्याच ठेवण्यात आल्या असून, त्यात आवश्यक असलेल्या वस्तूच गायब असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी शॉपिंग करायला, चित्रपट पाहायला गेला असाल आणि दुखापत झाली तर तिथे तुम्हाला प्रथमोपचार मिळणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला रुग्णालयच गाठावे लागेल.‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत या गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. कपडे, वस्तू खरेदी करण्यासाठी, चित्रपट अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पाहण्यासाठी मॉल व मल्टिप्लेक्स संस्कृतींनी शहरात मोठा जम बसविला आहे. त्यामुळे शहरातील बहुतांशी मॉल आणि मल्टिप्लेक्स हे आठवड्याचे सातही दिवस सुरू असतात आणि गर्दीने फुललेले असतात. त्यामध्ये सरकते जिने असतात. त्याचबरोबर इतर अनेक गोष्टींमुळे वृद्ध, लहान मुले पडण्याच्या घटना घडू शकतात. अशा वेळी तातडीने प्रथमोपचार मिळाले तर अपघात गंभीर असो वा किरकोळ, त्या व्यक्तीला झालेली दुखापत थोडक्यावर निभावू शकते. मात्र अशी कोणतीही सक्षम यंत्रणाच या मॉल व मल्टिप्लेक्समध्ये नाही. ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी शहरतील काही मॉल्स व मल्टिप्लेक्समध्ये जाऊन याची तपासणी केली आणि त्या काळात काहींना दुखापत झाल्यावर तेथे प्रथमोपचार पेट्या आणि दिली जाणारी सेवा याची पाहणी केली. त्यात अनेक मॉल, मल्टिप्लेक्समध्ये प्रथमापेचार पेट्या म्हणून टिफिन बॉक्सचा, प्लॅस्टिकच्या डब्यांचा वापर करण्यात आला होता. प्रथमोपचार पेट्यांमध्ये काय हवे याचे ‘स्टॅण्डर्ड’ मात्र एकाही मॉल, मल्टिप्लेक्सच्या प्रथमोपचार पेट्यांमध्ये दिसून आले नाही. या पेट्यांमध्ये केवळ कापूस, अॅन्टिसेफ्टिक, एखादे जखमेवरचे मलम एवढ्याच गोष्टी आढळून आल्या. महत्त्वाचे म्हणजे, तीन-चार मजले असलेल्या मॉल, मल्टिप्लेक्समध्ये केवळ एकच प्रथमोपचार पेटी ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे कोणत्याही मजल्यावर एखाद्याला दुखापत झाली तरी त्याला उपचार मिळण्यास दहा ते पंधरा मिनिटे ताटकळत बसावे लागत असल्याचे सत्य समोर आले. काही मॉलमध्ये तर दुखापत झालेल्यांना, तळमजल्यावर गेल्यावरच तुम्हाला प्रथमोपचार पेटी मिळेल, असे सांगण्यात आले. एखाद्या-दुसऱ्या मल्टिप्लेक्समध्ये प्रथमोपचार पेट्या चांगल्या पद्धतीने ठेवण्यात आल्याचेही दिसून आले. दैनंदिन कामकाजानिमित्त दररोज हजारो नागरिक महापालिकेत येतात. मात्र, त्या ठिकाणी लहान-मोठा अपघात झाल्यास तत्काळ उपचारासाठी कोठेही प्रथमोपचारपेटी नाही. विशेष म्हणजे मुख्य इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर आरोग्य विभागाचे कार्यालय असले तरी, या ठिकाणी एखादा रुग्ण आणल्यास त्याच्या उपचारासाठीचे कोणतेही साहित्य नाही. विशेष म्हणजे आरोग्य विभागाकडे याबाबत विचारणा केली असता, अशी कोणतीही यंत्रणा नसल्याचे त्यांच्याकडूनच सांगण्यात आले.महापालिकेच्या मुख्य भवनाच्या इमारतीत, सर्व विभागांची कार्यालये तसेच राजकीय पक्षांची पक्ष कार्यालये आहेत. चार मजली असलेल्या या इमारतीत दररोज राजकीय कार्यकर्त्यांसह शेकडो नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे एखादा अपघात झाल्यास प्रथमोपचार करण्यासाठीची कोठेही यंत्रणा नाही. त्यामुळे एखाद्यास लहान-मोठा अपघात झाल्यास परिसरातील दवाखाना गाठावा लागतो. गुरुवारी अशाच प्रकारे महापालिकेच्या एका कर्मचाऱ्यास फिट आली होती. मात्र, त्यावर उपचार करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसल्याने त्याला रुग्णालयात नेण्यासाठी कमला नेहरू रुग्णालयातून अॅम्ब्युलन्स मागविण्यात आली होती. त्यामुळे मोठा अपघात झाल्यास व तत्काळ प्रथमोपचार न मिळाल्यास जीवितहानी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
प्रथमोपचार पेटीच ‘आजारी’
By admin | Published: April 20, 2015 4:33 AM