पुणे : शहरातील शिवसेनेचे माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केलाच. मुख्यमंत्री शिंदे शनिवारी रात्री दिल्लीहून पुणे मार्गे पंढरपूरला जाणार होते. भानगिरे यांनी हडपसरमध्ये त्यांच्या स्वागताचा कार्यक्रम घेतला. तसे त्यांनी जाहीरही केले. त्यामुळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देशमुख यांनी त्यांचा याबाबतचा अहवाल पक्षाकडे मुंबईत पाठवला.
भानगिरे हडपसरमधील शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत. त्यांच्यामुळे शिंदे गटाला आता पुणे महापालिकेत एक शिलेदार मिळाला आहे. ते दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतही प्रवेश केला होता. तेथून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. त्यात पराभव झाल्यानंतर ते पुन्हा शिवसेनेत परतले. त्यानंतर दुसऱ्यांदा नगरसेवक झाले. विसर्जित महापालिकेत ते नगरसेवक होते.
जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नाही. त्यामुळे शिंदे यांचे बंड झाले त्यावेळी पुण्यातून त्याला शून्य प्रतिसाद मिळाला होता. मात्र शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद आल्यानंतर पुरंदरमधील माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सर्वप्रथम शिंदे गटाला पाठिंबा दिला. त्यानंतर आता पुणे महापालिका कार्यक्षेत्रातही नाना भानगिरे यांच्या माध्यमातून शिंदे गटाचा झेंडा रोवला गेला आहे. यावर शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांनी सांगितले की, याबाबतची माहिती पक्षप्रमुखांकडे देण्यात आली आहे.