पुणे : पुणे महापालिकेच्या माजी नगरसेविका ॲड. रुपाली पाटील ठोंबरे यांनी बंडातात्या कराडकर यांनी दि. ३ फेब्रुवारी रोजी राजकीय महिलांविषयी केलेल्या बेताल वक्तव्याचे विरुद्ध पुणे येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात खटला दाखल केलेला आहे. या प्रकरणात न्यायालयाने सदर प्रकाराची दखल घेऊन आरोपींवर कडक शासन करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. याबाबत पुढील सुनावणीची तारीख उद्या निश्चित होण्याची शक्यता आहे.
राज्यातील नेते आणि त्यांची मुले, सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे या दारू पितात, असे वक्तव्य गुरुवारी सकाळी व्यसनमुक्तीचे ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी सातारा येथे केले होते. मात्र, दुपारी इंदापूर तालुक्यातील गोतोंडी येथे त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले, ‘ज्यांच्याबद्दल मी वक्तव्य केले आहे, त्यांच्या भावना दुखावल्या असतील, तर मी माफी मागायला तयार आहे,’ असे सांगितले.
पुढे बोलताना कराडकर म्हणाले, ज्यांच्याविषयी मी बोललो त्यांच्याशी मी फोनवरून संपर्क केला आहे. त्यामुळे जर माझे वक्तव्य चुकले असेल, तर मी माफी मागतो. त्यात कमीपणा कसला’, असे कराडकर म्हणाले. ‘मी सकाळी विविध विषयांवर बोललो; पण फक्त मोजकाच भाग दाखवला गेला. तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला सगळे माहीत आहे आणि उभ्या महाराष्ट्रालाही माहिती आहे, कोण दारू पितात. त्यात काही विशेष नाही. सरकार दारू प्या म्हणतेय. कारण सरकारला त्यामधून महसूल मिळतो.’