पुणे: मागील काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक परिपत्रक काढले होते. त्यात जर कोणी आयोगाबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहला किंवा तो शेअर केला किंवा अश्लील भाषेतील टीका-टिपणी/ संभाषण केल्यास त्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात येईल असं सांगितले होते. आता त्याच अनुषंगाने MPSC ने कारवाई केली आहे. आयोगाबद्दल अश्लील अपशब्द वापरून शिवीगाळ केल्यामुळे विठ्ठल चव्हाण (vitthal chavan) या नावाने ट्विटर खाते असलेल्या व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती एमपीएससीने ट्विटरवरून दिली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा कडून मिळालेल्या माहितीनुसार एमपीएससी बद्दल शब्द वापरणाऱ्या व शिवीगाळ करणाऱ्या विठ्ठल चव्हाण या नावाने ट्यूटर अकाउंट चालवणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. संबंधित व्यक्ती नेमकी कोण आहे. हे अद्याप समजू शकलेले नाही.
लोकसेवा आयोगामार्फत (mpsc) आयोजित परीक्षा आणि निकालासंदर्भात समाज माध्यमांवर केल्या जाणाऱ्या टिका-टप्पणीवर आयोगाची आता नजर आहे. यापुढील काळात विद्यार्थ्यांनी भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवार/व्यक्ती यांच्याकडून केल्या जाणाऱ्या असभ्य, असंस्कृत, असंसदीय व अश्लील भाषेतील टीका-टिपणी/ संभाषण केल्यास त्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे परिपत्रक यापूर्वीच प्रसिद्ध केले आहे.
या परीक्षा देणारे विद्यार्थी किंवा परीक्षार्थी विविध सोशल मीडियावर आयोगाची जी बदनामी करतात ती थांबवण्याकरिता परिपत्रक काढले असल्याचे आयोगाने या परिपत्रकात नमूद केले होते. तर आयोगाने हे परिपत्रक काढून विद्यार्थ्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणल्याची भावना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्याऱ्या विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे.