तन्मय ठोंबरे
पुणे : ख्रिसमस सण काही दिवसांवर येऊन ठेपला असून, त्यानिमित्त चर्चमध्ये सजावटीची कामे केली जात आहेत. त्यानिमित्त शहरातील पहिल्या चर्चची माहिती जाणून घेतली. त्यामध्ये शहरातील पहिले चर्च हे सेंट मेरीज असून, ते ब्रिटिशांनी बांधलेले आहे. या चर्चची स्थापना १८२३ साली झाली. चर्चच्या स्थापनेपासूनच्या वस्तूंबरोबरच स्मृतिस्थळे चर्चमध्ये आहेत. चर्चचे पहिले धर्मगुरू रेवरंड टी. रॉबिन्सन होते, तर आता रेवरंड डॉ. प्रमोद काळसेकर कार्यरत आहेत.
सेंट मेरीजमध्ये १६० वर्षांपूर्वीचे तब्बल २७ पंखे आहेत. ब्रिटिशांनी अल्युमिनियमपासून पंखे तयार केले असून त्याला दोनच पाती आहेत. आज देखील हे पंखे नवीन असल्यासारखे आहेत. चर्चमध्ये पितळी गरुड असून, त्यावर बायबल ठेवून वाचले जाते. ब्रिटिशांच्या काळातील मुंबईचे गव्हर्नर रॉबर्ट ग्रांट यांचे स्मृतिस्थळ येथे आहे. मुंबईतील ग्रांट रोडला त्यांचे नाव दिले आहे. ९ जुलै १८३८ साली यांचे निधन झाले. त्या काळातील मुंबईच्या सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश एडवर्ड वेस्ट यांचेही स्मृतिस्थळ चर्चमध्ये आहे.
चर्चमध्ये शिशाच्या तुकड्यांनी जोडलेले पवित्र शास्त्रातील प्रमुख घटनांचे चित्र साकारलेले आहे. तसेच धर्मगुरू प्रवचन करण्यासाठी ब्रिटिशकालीन दगडी पुलपीट आहे.
ब्रिटिश कालीन झेंडे जे युद्धामध्ये वापरले होते, ते देखील येथे आहेत. चर्चचे व्यवस्थापक शमूवेल ओहोळ म्हणाले की, सेंट मेरीज हे शहरातील सर्वांत पहिले चर्च आहे. २०२२-२३ साली या चर्चला २०० वर्षे पूर्ण होणार आहेत.
एडवर्ड वेस्ट आणि रॉबर्ट ग्रांट यांचे स्मृतिस्थळासाठी लंडनच्या राणीची परवानगी घ्यावी लागली होती. त्याशिवाय चर्चमध्ये दोन स्मृतिस्थळ तयार करता आली नसती.
चर्चमध्ये एक माइलस्टोन आहे. समुद्रसपाटीपासून इमारतीची उंची किती ते त्यावरून समजते. आजही सरकारी अधिकारी त्या ठिकाणी येऊन मोजमाप करतात.