कोरोनाच्या साथीमुळे केवळ शारीरिक नव्हे, तर मानसिक, भावनिक, आर्थिक, सामाजिक प्रश्नही निर्माण झाले आहेत. काहींच्या नोकऱ्या गेल्या, काहींचे व्यवसाय बंद पडले, काहींच्या घरातील व्यक्ती कोरोनामुळे निधन होऊन दुरावल्या. घरगुती भांडणे, हिंसाचार यांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात मानसोपचारतज्ज्ञांच्या बाह्यरुग्ण विभागात रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, प्रत्येक रुग्णाला औषधांची गरज नसते. रुग्णांची समस्या लक्षात घेऊन त्याप्रमाणे उपचारांची गरज ठरवली जाते.
------
कोरोनाकाळात भविष्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. मानसिक ताण हा अवघड परिस्थितीत निर्माण होणे साहजिक आहे. ‘मनसंवाद’ हेल्पलाईनवर अनेक नागरिकांचे फोन येतात आणि त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्येकाला नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी औषधांची गरज नसते. तीव्र स्वरूपाच्या नैराश्यामध्ये औषधोपचार केले जातात. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे हितकारक नसते.
- डॉ. नितीन अभिवंत, मानसोपचारतज्ज्ञ, ससून रुग्णालय
------
गेल्या वर्षभरात रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोविड, पोस्ट कोविड आणि आतापर्यंत कोविड न झालेले अशा सर्वांमध्येच भीतीचे वातावरण आहे. प्रत्येक वयोगटात मानसिक ताण दिसून येतो. नैराश्याची लक्षणे, तीव्रता पाहून उपचार ठरवले जातात. काही काळासाठी अँटी-डिप्रेशन गोळ्या आणि दूरगामी काळासाठी समुपदेशन अशी उपचारांची दिशा जास्त उपयुक्त ठरते. रुग्णांना डॉक्टरांनी लिहून दिलेल्या गोळ्या तितक्याच प्रमाणात मिळू शकतात. गोळ्यांचे प्रमाण स्वतःच्या मनाने वाढवून घेता येत नाही. मुले, वृद्ध व्यक्ती यांना शक्यतो औषधे देणे टाळले जाते.
- डॉ. हिमानी कुलकर्णी, मानसोपचारतज्ज्ञ
---------
डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कोणतीही अँटी-डिप्रेशन औषधे देण्यास परवानगी नाही. गेल्या वर्षभरात औषधांची विक्री वाढल्याचे निदर्शनास आलेले नाही. रुग्णांनी अशा औषधांची विचारणा केली, तरी चिठ्ठी काटेकोरपणे तपासली जाते. डॉक्टरांनी लिहून दिलेल्या प्रमाणातच औषधे दिली जातात. तसेच, प्रत्येक वेळी नवीन प्रिस्क्रिपशन आवश्यक असते.
- अनिल बेलकर, सचिव, केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट