पुणे विद्यापीठात उभारणार देशातील पहिला 'सावित्रीबाई फुलेंचा पूर्णाकृती पुतळा'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 01:34 PM2021-11-29T13:34:40+5:302021-11-29T14:03:46+5:30
विद्यापीठ आवारात बसवण्यात आलेल्या महात्मा फुले यांच्या पुतळ्या जवळच विद्यापीठ प्रशासनाने सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारण्यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे
पुणे : महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील पहिला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पहिला पूर्णाकृती पुतळा सावित्रीबाई फुलेपुणे विद्यापीठात मुख्य इमारतीसमोरील जागेत उभारला जाणार असून पुतळा बसवण्याच्या जागेचे भूमीपूजन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते रविवारी दुपारी करण्यात आले.
पुणे विद्यापीठाचा नामविस्तार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असा करण्यात आला. त्यानंतर विविध संस्था ,संघटनांकडून विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बसवण्याची मागणी करण्यात आली. त्यावर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने पुतळा बसवण्यास मान्यता दिली. विद्यापीठ आवारात बसवण्यात आलेल्या महात्मा फुले यांच्या पुतळ्या जवळच विद्यापीठ प्रशासनाने सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारण्यासाठी जागा निश्चित करण्यात आली. परंतु, समता परिषदेच्या पदाधिका-यांनी त्यावर आक्षेप घेतला. त्यामुळे स्वत: छगन भुजबळ यांनी यात लक्ष दिले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच छगन भुजबळ ,राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त,पुरातत्त्व विभाग, कला संचालनालय, वन विभाग आदी पदाधिका-यांची बैठक घेऊन पुतळा बसवण्याच्या प्रक्रियेस तत्वत: मंजूरी दिली. त्यामुळे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरील गार्डनमधील जागा निश्चित करण्यात आली आहे. ही जागा मुख्य इमारतीमधील ज्ञानेश्वर सभागृहाच्या विरूध्द बाजूस आहे.
पुतळ्याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, पुतळा समितीचे अध्यक्ष व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.संजय चाकणे, डॉ.सुधाकर जाधवर,अधिष्ठाता डॉ.पराग काळकर, समता परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुतळ्याचे अनावरण 3 जानेवारीला
सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त येत्या 3 जानेवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुतळ्याचे अनावरण होणार आहे. येत्या 20 डिसेंबरपर्यंत पूर्णाकृती पुतळा विद्यापीठाच्या ताब्यात मिळणार आहे. त्यामुळे लवकरच विद्यापीठात पुतळा उभा राहणार आहे.