पुणे : कौटुंबिक कारणावरून बहिणीला सतत त्रास देणाऱ्या दाजीचा मेहुण्यानेच डोक्यात रॉड घालून खून केला. त्यानंतर स्वत: त्याच खोलीत गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बाणेर येथील श्री समृद्धी सोसायटीत मंगळवारी सकाळी उघडकीस आली. धनंजय पद्माकर साडेकर (३८) असे दाजीचे, तर हेमंत रत्नाकर काजळे (४०) असे त्यांच्या मेहुण्याचे नाव आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. धनंजय साडेकर हे हॉस्टेल चालवत होते, तर हेमंत काजळे हा बेरोजगार होता. बहिणीचे लग्न झाल्यापासून दाजी धनंजय साडेकर हा सतत वेगवेगळ्या कारणाने पत्नीला त्रास देत होता. सोमवारी रात्री देखील या नवरा-बायकोमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते.
मंगळवारी सकाळी काजळेने साडेकर यांना जाब विचारला असता, त्यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात काजळेने साडेकर यांच्या डोक्यात गज मारला, त्यात साडेकर गंभीर जखमी झाले. त्यानंतर काजळेने बहिणीला घटनेची माहिती कळविल्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी साडेकर आणि काजळे यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्या दोघांचा मृत्यू झाला होता, अशी माहिती चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिली.