लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याने उसाचा पहिला हप्ता २५८५ रुपये आज जाहीर केला. ही रक्कम ११ डिसेंबरपर्यत सभासदांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. शनिवारी (दि. ९) संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजनकुमार तावरे यांनी दिली.राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने पहिला हप्ता ३००० रुपये द्यावा, गेटकेन बंद करून सभासदांच्या ऊस गाळपासाठी घ्यावा, या मागण्यांसाठी रविवारी (दि. १०) आंदोलन करण्यात येणार आहे. मात्र, आंदोलनाच्या पूर्वसंध्येला कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष तावरे यांनी सांगितले, की माळेगावने शासनाच्या नियमाप्रमाणे २५८५ रुपये पहिला हप्ता जाहीर केला आहे. राष्ट्रवादी पुरस्कृत शेतकरी बचाव कृती समितीची ३ हजार रुपये पहिल्या हप्त्याची मागणी राजकीय हेतूने प्रेरित आहे. राज्यात कोणीही एवढा पहिला हप्ता दिलेला नाही. लोकप्रतिनिधी अजित पवार यांच्या अधिपत्याखाली असणाºया सोमेश्वरमध्ये पहिल्याच महिन्यात ८० टक्के १ लाख १५ हजार टन गेटकेन ऊस गाळप करण्यात आला आहे. छत्रपती कारखानादेखील गेटकेन ऊस गाळप करीत आहे. मग पवार हे केवळ राजकीय आकसाने केवळ माळेगावलाच गेटकेन बंद करण्याची भूमिका घेत आहेत. त्यांची ही भूमिका चुकीची असून लोकप्रतिनिधी पदाला शोभणारी नाही. पवार यांच्या अधिपत्याखाली सुरू असणाºया कारखान्यांमध्ये गेटकेन ऊस चालतो. मात्र, माळेगावला चालत नाही. हा अजब न्याय आहे.आज शेतकरी बचाव कृती समितीचे होणारे आंदोलन खासगी कारखानदारांची दुकानदारी चालविण्यासाठीच आहे. या आंदोलनातुन खासगी कारखानदारांना मदत करण्याचा कृती समितीचा प्रयत्न आहे. माळेगावची उच्चांकी भावाची परंपरा आहे. ही परंपरा खंडित करण्यासाठी राजकीय हेतुने आजचे हे आंदोलन आहे. सभांसदाचा ऊस वेळेत गाळप करण्यासाठी संचालक मंडळ कटिबद्ध आहे. छत्रपती कारखान्याचा साडेतीन वर्ष विस्तारीकरणाचे काम सुरू होते. त्यांचे केवळ १००० ते १२०० टन प्रतिदिन गाळप सुरू आहे.माळेगावचे विस्तारीकरणाचे काम केवळ साडेतीन महिन्यात पूर्ण करण्यात आले आहे. माळेगाव यामधून प्रतिदिन ५४०० प्रतिटन ऊस गाळप करीत आहे. सभासद आणि गेटकेन ऊस गाळपातून अधिक गाळप करण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न आहे. त्यातून सभासदांना अधिक दर देणे शक्य होणार आहे. त्यामुळे आज होणारे आंदोलनाचा राजकीय हेतू माळेगावच्या सभासदांनी ओळखला असल्याचे अध्यक्ष तावरे म्हणाले.
माळेगावचा पहिला हप्ता २५८५ रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 1:40 AM