पुणे : अहमदनगर जिल्ह्यातील ३५ वर्षीय गृहिणी पाण्याचा हंडा भरून आणत असताना पाय घसरून पडली. तिला उपचारांसाठी १५ एप्रिल रोजी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांदरम्यान २० एप्रिलला या महिलेस ब्रेन डेड घोषित करण्यात आले. नातेवाईकांचे समुपदेशन केल्यामुळे त्यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. या महिलेचे हृदय, यकृत आणि दोन मूत्रपिंडे दान करण्यात आली. यातील एक मूत्रपिंड ससून रुग्णालयातील एका रुग्णामध्ये प्रत्यारोपित करण्यात आल्याने त्याला नवसंजीवनी मिळाली. ससून सर्वोपचार रुग्णालयातील हे पहिलेच किडनी प्रत्यारोपण ठरले आहे. या महिलेने नेत्रदानही केले आहे. ससूनमधील एका ३३ वर्षीय तरुणाचेही मूत्रपिंड आणि यकृत दान करण्यात आले. अहमदनगरमधील महिलेचे हृदय रुबी हॉल क्लिनिक, यकृत दीनानाथ मंगेशकर, एक मूत्रपिंड नाशिक तर दुसरे मूत्रपिंड ससून रुग्णालयात दान करण्यात आले. महिलेमुळे चार रुग्णांना नवसंजीवनी मिळाली. याप्रकारे हे ससूनमधील पहिलेच प्रत्यारोपण ठरले आहे, अशी माहिती ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी दिली.नगरमधीलच एक ३३ वर्षांच्या तरुणाचा मंचर येथे अपघात झाला होता. त्याला उपचारासाठी १६ एप्रिल रोजी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना २० एप्रिल रोजी त्याला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. ३३ वर्षीय रुग्णाचे यकृत सह्याद्री रुग्णालयात दान करण्यात आले. त्याचे मूत्रपिंडही खासगी रुग्णालयातील रुग्णावर प्रत्यारोपित करण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीच्या (झेडटीसीसी) समन्वयक आरती गोखले यांनी दिली या अवयवदानासाठी डॉ. दिलीप कदम, डॉ. सुरेश पाटणकर, डॉ. अभय सदरे, डॉ. राजेश श्रोत्री, भालचंद्र कश्यपी, डॉ. निरंजन आंबेकर, डॉ. किरण जाधव, डॉ. अजय तावरे, डॉ. योगेश गवळी, डॉ. सोमनाथ सलगर, डॉ. हरिष टाटीया, डॉ. इब्राहिम अन्सारी, डॉ. नितेश अग्रवाल यांनी परिश्रम घेतले.
ससूनमध्ये पहिले किडनी प्रत्यारोपण
By admin | Published: April 21, 2017 6:11 AM